सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू : कंत्राटदार कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:03 AM2019-03-31T01:03:06+5:302019-03-31T01:03:55+5:30
स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्विमिंग पुलाची साफसफाई करताना करंट लागून ठार झालेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूला कंत्राटदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना तब्बल चार महिने लागले, हे विशेष!
घनश्याम हिंगणे (रेल्वे गेस्ट हाऊसजवळ मोतीबाग) हा तरुण २३ नोव्हेंबर २०१८ ला दुपारी पाचपावलीतील फुटबॉल ग्राऊंड जवळच्या स्विमिंग पुलाची साफसफाई करण्यासाठी गेला होता. आरोपी कंत्राटदाराने विजेची मोटर सुरूच ठेवल्याने पाण्यात उतरताच घनश्याम हिंगणेला जोरदार करंट लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुशांत समन गजभिये (वय ३२) याने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. प्रकरण तपासात घेतल्यानंतर हिंगणे याचा मृत्यू कंत्राटदार किशोर पौनीकर याच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष पाचपावली पोलिसांनी काढला. त्यानुसार पौनीकरविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.