हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू : खुनाच्या गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:17 PM2019-05-15T22:17:37+5:302019-05-15T22:18:43+5:30
पत्नीसोबत झालेल्या वादात तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज खोब्रागडे याचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या वडिलांनी मुलाच्या हत्येत साळ्यासह पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीसोबत झालेल्या वादात तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज खोब्रागडे याचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या वडिलांनी मुलाच्या हत्येत साळ्यासह पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे.
१२ मेच्या रात्री सूरजची हत्या करण्यात आली होती. सूरजचा पत्नी अश्विनीसोबत वाद झाला होता. अश्विनीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घरी बोलविले होते. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अश्विनीचा भाऊ अंकुश बन्सोडने एकट्यानेच सूरजवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. या आधारावर जरीपटका पोलिसांनी हत्येच्या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून अंकुशला अटक केली आहे. सूरजचा मेडिकलमध्ये उपचार सुरू होता. मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
सूरजचे वडील नरेंद्र खोब्रागडे यांनी हत्येत अंकुशचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र खोब्रागडे चौकीदारी करतात. त्यांच्यानुसार १४ फेब्रुवारी २०१६ ला सूरजचा विवाह झाला होता. तेव्हापासूनच अश्विनी आणि तिचे कुटुंबीय सूरजला त्रास द्यायचे. त्याला एकदा मारहाण करण्यात आली होती. सूरजचा अश्विनीसोबत सामान्य दाम्पत्याप्रमाणेच वाद व्हायचा. पण अश्विनी आपल्या कुटुंबीयांना घरी बोलवून वाद वाढवायची. घटनेच्यावेळी अश्विनीने कुटुंबीयांना फोन करून घरी बोलविले होते. कुटुंबीयांनी सूरजला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते. त्यावेळी ड्युटीवर असल्यामुळे घरी पोहोचलो नाही.
वादाच्या कारणाने त्यांनी सूरजची हत्या केली. हत्येत अश्विनी आणि तिच्या आई-वडिलांचा सहभाग आहे. त्यांच्या बचावासाठी अंकुशने गुन्हा एकट्यानेच केल्याचे सांगितले आहे. सूरजला १० महिन्यांचा आदर्श नावाचा मुलगा आहे. खोब्रागडे यांनी अन्य आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सूरज एकुलता एक मुलगा होता. कुटुंबात पत्नीसह विवाहित मुलगी आहे. आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीत हत्येच्या गुन्ह्यात अंकुश सहभागी असल्याचे दिसून आले आहे. जरीपटका पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.