नागपूर : खापरखेडा येथील ५०० मेगावॅटच्या वीज केंद्रात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास घडली. अमोल हेमराज जाणे (रा. पोटा) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा सोमवारी रात्रपाळीत कन्व्हेअर बेल्ट दुसरा माळा टीपी-३ येथे काम करीत होता. त्याच्या सोबत अरुण आणि प्रशांत हे कामगार कामावर होते. कन्व्हेअर बेल्ट सुरू असताना बेल्टमधून आवाज येत होता. अमोलने जाऊन पाहिले असता बेल्ट घासत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तुकडा काढत असताना कन्व्हेअर बेल्ट आणि पुल्लीमध्ये अमोल अडकला. यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अमोलचा हात तुटून कन्व्हेयर बेल्टसोबत समोर निघून गेला. दीड तास शोध घेतल्यानंतर तिसऱ्या माळ्यावर कन्व्हेअर-७ मध्ये तुटलेला हात मिळाला. चालू कन्व्हेअर बंद न करता बेल्टचा तुकडा अमोल याला काढण्यास कुणी सांगितले? हा अपघात कसा घडला? याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल ४ दिवसांत संबंधित समितीला द्यायचा आहे. अमोल हा विवाहित असून, त्याला ३ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी आहे. आधी अमोल आई-वडिलांसोबत सिल्लेवाडा येथे राहत होता. त्याच्या पत्नीचे माहेर पोटा येथील आहे. लग्नानंतर अमोल पोटा येथे त्याचे सासरे तुलारामजी भड यांच्याकडे राहत होता.
मृत अमोलच्या परिवाराला मदत
मंगळवारी सकाळी सीएचपी विभागातील बहुतांश कामगार कामावर गेले नाहीत. वीजकेंद्राच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अमोलचे कुटुंबीय, कंत्राटी कामगार युनियनचे पदाधिकारी, कंत्राटदार व वीज केंद्राच्या अधिकारी यांची बैठक झाली. तीत अमोलच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची मदत देण्याचे संबंधित कंत्राटदाराने जाहीर केले. यासोबतच त्याच्या पत्नीस नोकरी तसेच २ लाख रुपयांची मदत महाजेनकोच्या वतीने करण्यात येणार आहे.
कंत्राटी कामगारांचा रोष
चालू कन्व्हेअरमध्ये हा अपघात घडल्याने रात्रपाळीला कार्यरत असलेल्या महाजेनकोच्या कर्मचाऱ्यांवर कंत्राटी कामगारांनी रोष व्यक्त केला. कन्व्हेअर बेल्ट बंद न करता चालू कन्व्हेअरमध्ये बेल्टचा तुकडा का काढण्यात आला, हा प्रश्न यावेळी कामगारांनी उपस्थित केला. कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला, याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.