नागपुरात विद्यार्थ्यांच्या मारपिटीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:04 PM2018-08-03T21:04:49+5:302018-08-03T21:06:17+5:30
जीएस कॉलेजमध्ये वर्गात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारपिटीत बारावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर २४ तासानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करणारे पोलीस अचानक सतर्क झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीएस कॉलेजमध्ये वर्गात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारपिटीत बारावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर २४ तासानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करणारे पोलीस अचानक सतर्क झाले. मृत विद्यार्थी मानकापूर येथील रहिवासी १७ वर्षीय राहुल राधारमण तिवारी आहे.
राहुल जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी होता. त्याची लहान बहीण निशितासुद्धा जीएस कॉलेजमध्ये अकरावीला आहे. दोघेही सोबत कॉलेजला यायचे. परंतु २ आॅगस्टला एमएससीईटीची परीक्षा असल्याने निशिता कॉलेजला गेली नाही. राहुल सकाळी ११ वाजता घरून कॉलेजसाठी निघाला. दुपारी ३.४५ वाजता मनिषा चौधरी या शिक्षिकेचा क्लास संपल्यानंतर त्या बाहेर पडल्या. दुसरी शिक्षिका येण्यापूर्वी राहुलचा वर्गातील विद्यार्थ्यासोबत वाद झाला. सूत्रांच्या मते राहुलने त्या विद्यार्थ्याकडे पेन फेकला होता. त्या विद्यार्थ्याने पुन्हा राहुलकडे पेन फेकला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. राहुलने त्याला थापड मारली. संतप्त होऊन त्या विद्यार्थ्याने सुद्धा राहुलला थापड मारली. पण राहुल जमिनीवर पडला. त्यामुळे वर्गात खळबळ माजली. राहुल पडल्याचे सांगत विद्यार्थी शिक्षकाकडे ओरडत गेले. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याला स्पोर्ट रुममध्ये पोहचविले. तिथे ग्लुकोज पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुलकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला रविनगर येथील दंदे रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले. डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना सूचना देऊन मृत विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
घटनेची माहिती मिळताच राहुलचे नातेवाईक दंदे हॉस्पिटलमध्ये पोहचले. शिक्षकांनी त्यांना राहुल पडल्याचे सांगितले. परंतु राहुलच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच संशय होता. घटनेच्या नंतर काही विद्यार्थी सुद्धा दंदे हॉस्पिटलमध्ये पोहचले पण आज सकाळी कुणीही पोहचले नव्हते. कॉलेज नियमित सुरू होते. राहुलचे कुटुंबीय शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह सीताबर्डी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मृतदेह तिथेच सोडून पोलिसांसोबत जीएस कॉलेजला पोहचले. कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षिकेकडून घटनेची विचारणा केली. परंतु शिक्षिकेने वर्गात मारपीट झाल्याचे सांगितले नाही. कुटुंबीयांनी हजेरी रजिस्टर बघितले. त्यानुसार वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांकडून विचारणा करण्यात आली. यात राहुलला मारहाण झाल्याची माहिती पुढे आली.