-अन् मृत्यू स्पर्शून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:38 AM2017-08-30T01:38:57+5:302017-08-30T01:40:05+5:30

सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...

The death was touched | -अन् मृत्यू स्पर्शून गेला

-अन् मृत्यू स्पर्शून गेला

Next
ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात प्रवाशांनी सांगितला थरार : विधात्याचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सकाळी ६.३० वाजताची वेळ असेल...साखरझोपेतून नीट जागही आली नव्हती...मुंबई गाठायला आणखी तासभर उशीर असल्याने जवळपास सर्वच प्रवासी बर्थवर पडून होते...अशा बेसावध क्षणी अचानक जोराचा आवाज झाला...गाडीची लय बिघडली व पाहता पाहता इंजिनसह सात डबे रुळावरून घसरले...वरच्या बर्थचे प्रवासी खाली कोसळले...सामानही अस्ताव्यस्त झाले...काही तरी अघटित घडल्याची जाणीव झाली...सगळे शांत झाल्यावर बाहेर डोकावून पाहिले तेव्हा...काळजात चर्र झाले...प्रत्यक्ष मृत्यू आम्हाला स्पर्शून गेला होता...या प्रतिक्रिया आहेत नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात अनुभवणाºया नागपूरकर प्रवाशांच्या. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा मंगळवारी सकाळी मुंबईजवळ आसनगाव-वासिंददरम्यान अपघात झाला. या गाडीतील प्रवाशांनी स्वत:ला सुरक्षित असल्याचे पाहून विधात्याचे आभार मानले.
पालकमंत्र्यांनी केली गाड्यांची व्यवस्था
अपघात होताच माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. जिल्हाधिकाºयांनी ही माहिती रेल्वे डीआरएमला कळविली व मदतीसाठी नाशिक जिल्हाप्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर जैस्वाल यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. घटनेचा, घटनेनंतरच्या परिस्थितीचा व्हिडिओ व फोटो पाठविले. पालकमंत्र्यांनी लगेच दखल घेत संकटग्रस्त प्रवाशांसाठी गाड्या पाठविण्याची व्यवस्था केली. काही प्रवाशांना या गाड्यांतून नाशिकला सुखरूप पोहोचविण्यात आले. याशिवाय पालकमंत्र्यांनी नागपूर व नाशिक जिल्हाधिकाºयांसह अपघातग्रस्त लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या संपर्कात राहून घटनेचा आढावा घेतला.
भीषण संकट टळले
‘सर्व प्रवासी झोपेत होते. आसनगाव स्टेशनच्या पुढे जोरात झटका बसला. बर्थवरील काही प्रवासी धक्का दिल्यासारखे खाली पडले. एकच आरडाओरड झाली. गाडी अचानक थांबली आणि कुणालाच काही सुचले नाही. काही लोकांनी खिडकीतून बाहेर डोकावले असता गाडीच्या इंजिनला लागून असलेले डबे रुळाखाली घसरले होते. १५ मिनिटातच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची भीषणता लक्षात घेता मोठा घातपात झाल्याचे दिसत होते. परंतु कुणालाही यात मोठी दुखापत झाली नाही. गाडीचा वेग कमी असल्यामुळे प्रवाशांवर आलेले भीषण संकट टळले.’
-जस्टीन राव, पत्रकार
४९३ प्रवाशांचा जीव आला असता धोक्यात
दुरांतोच्या अपघातात या गाडीचे आठ कोच रुळाखाली घसरले. गाडीचा वेग कमी असल्यामुळे या कोचला अपघात झाला नाही नाहीतर ४९३ प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला असता. रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एच १ या कोचमध्ये २३ प्रवासी, ए १ या कोचमध्ये ५२, ए २ कोचमध्ये ५२, ए ३ कोचमध्ये ५२, बी १ या कोचमध्ये ७४, बी २ कोचमध्ये ८०, बी ३ कोचमध्ये ८० आणि बी ४ या कोचमध्ये ८० असे एकूण ४९३ प्रवासी होते. रुळावरून घसरून हे कोच न उलटल्यामुळे या प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
मृत्यू जवळून पाहिला
सकाळी ६.१५ च्या सुमारास दुरंतोच्या ड्रायव्हरला रुळावर दरड कोसळल्याचे दिसले. त्याने इमरजन्सी ब्रेक मारले. यात गाडीचे इंजिन व सात डबे उलटले. मी ए १ कोचमध्ये ३७ क्रमांकाच्या बर्थवर होतो. सोबत आ. नागो गाणार व माजी खासदार डॉ. खुशाल बोपचेही होते. गाडीचे डबे एकाएक पलटले व आम्ही सर्वच खाली कोसळलो. एकमेकांच्या अंगावर प्रवासी व सामानांचा थर लागला होता. लगेच डब्यातून बाहेर पडलो. प्रवासी एकमेकांच्या मदतीला धावले. आधी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळांनी सामान बाहेर काढले. डबे उलटलेल्या ठिकाणी बाजूलाच नदी दुथडी भरून वाहत होती. डबे घसरून नदीत पडले असते तर माझ्यासकट अनेकांना जीव गमवावा लागला असता. कसारा घाटामुळे गाडीचा वेग कमी होता. हा अपघात दुसºया ठिकाणी झाला असता तर नक्कीच मोठी हानी झाली असती. आम्ही आज मृत्यू जवळून पाहिला.
- आशिष जैस्वाल, माजी आमदार
बालबाल बचावलो
‘सकाळी ६.३० वाजता एकदम गाडी थांबली. काय झाले एकदम काहीच कळले नाही. बी-३ कोचच्या बाहेर मोठा चिखल असल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हतो. लगेच गाडीचा अपघात झाल्याचे समजले. बाहेर येण्यासाठी एसी कोचमधून मागील बाजूला असलेल्या स्लिपर कोचमध्ये गेलो. अडीच किलोमीटर अंतरावरील आसनगावला स्टेशनला पायी गेलो. तेथून हायवे गाठून टॅक्सीने मुंबईला पोहोचलो. ईश्वराच्या कृपेमुळे जीव वाचल्याचा अनुभव आला.’
-विक्की मुदलियार, प्रवासी
मोठा घातपात टळला
‘सकाळी ६.३० वाजतााच्या सुमारास माझी पत्नी बर्थवरून अचानक खाली पडली. कोचमधील प्रवासीही खडबडून जागे झाले. काहीच कळायला मार्ग नव्हता. गाडी थांबली होती. पाच-सहा जण खालून अपघात झाल्याचे ओरडत होते. खाली उतरल्यानंतर गाडीचे इंजिन पलटी झाल्याचे दिसले. एसीचे सर्व कोच रुळावरून घसरले होते. पण त्यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. गाडीचा वेग अधिक असता तर मोठा घातपात झाला असता, हे निश्चित.’
-अमित रामटेके, पत्रकार

Web Title: The death was touched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.