कर्जवसुली थांबली; ठेवी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 09:55 PM2021-06-12T21:55:08+5:302021-06-12T23:41:45+5:30

Bank, Debt recovery stopped कोरोना दुसऱ्या लाटेचा बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील बँका व संस्थांवर परिणाम झाला असून नवीन व्यवसाय प्रभावित झाला आहे.

Debt recovery stopped; Deposits increased | कर्जवसुली थांबली; ठेवी वाढल्या

कर्जवसुली थांबली; ठेवी वाढल्या

Next
ठळक मुद्दे कोरोनाचा बँकिंग व सहकारी क्षेत्रावर परिणाम : मान्यवरांच्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना दुसऱ्या लाटेचा बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातील बँका व संस्थांवर परिणाम झाला असून नवीन व्यवसाय प्रभावित झाला आहे. कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने कर्जवसुली थांबली, पण तुलनेत ठेवी वाढल्या आहेत. कोरोनानंतर सहकारी बँकिंग क्षेत्राला पुढे चांगले दिवस येणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने बँका आणि पतसंस्थांचा व्यवसाय पूर्ववत होण्याची सहकारी बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांना अपेक्षा आहे.

कोरोना काळात अनेक सहकारी बँक आणि पतसंस्थांनी पुढाकार घेऊन लोकांना मदत केली. गेल्यावर्षी आणि यंदा कोरोना काळात सहकारी बँकिंग क्षेत्राची विश्वासार्हता आणखी वाढली आहे. दुकाने तब्बल दोन महिने बंद होती. त्यामुळे कर्जवसुली होऊ शकली नाही, पण आता व्यवसाय वाढीस लागल्याने कर्जवसुलीला सुरुवात झाली आहे. कर्जदारांना फोन करून सूचना देण्यात येत आहे. ठेवींच्या तुलनेत कर्जवाटप होणेही आवश्यक आहे. बँकिंग तज्ज्ञ म्हणाले, सरकारने नेहमीच राष्ट्रीयकृत बँकांना प्राधान्य देत सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. पण लोकांचा विश्वास आणि दक्ष व्यवस्थापनाने सहकारी बँकांचा व पतसंस्थांचा व्यवसाय नेहमीच वाढला आहे.

लोकांची बचत वाढली

कोरोना काळात सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये लोकांची बचत, शिवाय ठेवींमध्ये वाढ झाली आहे. दोन महिने व्यवसाय ठप्प राहिल्याने कर्जवसुलीवर परिणाम झाला आहे. संस्था वसुली मोहीम सुरू करतील. कर्ज वाटपाला सुरूवात झाली आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेची साखळी फिरायला लागली आहे.

स्वप्निल मोंढे, अध्यक्ष, श्री संत गजानन महाराज सहकारी पतसंस्था.

ग्राहक संख्या पटीने वाढली

कोरोना काळात सहकारी बँका आणि संस्थांमध्ये ग्राहकांची संख्या वाढली. या काळात लोकांनी पैसा हातात ठेवला. शिवाय कमी व्याजदरामुळे गोल्ड लोनमध्ये वाढ झाली तर नवीन कर्जदारांची संख्या कमी झाली. व्यवसाय बंद राहिल्याने कर्जवसुली झाली नाही. वसुली मोहीम सुरू होणार आहे. मान्सून चांगला राहिल्यास संस्था पूर्ववत होतील.

रवींद्र दुरगकर, अध्यक्ष, गांधीबाग सहकारी बँक़

आर्थिक व्यवहार पूर्ववत होणार

कोरोनापूर्वी व नंतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत सहकारी बँका आणि पतसंस्थांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली. लोकांचा सहकारी बँकांवर विश्वास आहे. कोरोना काळात लोकांनी हातात पैसा ठेवला. आता मार्केट खुले झाल्यानंतर लोकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे कर्जासाठी विचारणा होत आहे. बँकांची सहा महिन्यात चांगली स्थिती होईल.

विवेद जुगादे, अध्यक्ष, विवेकानंद नागरी सहकारी प्रत्यय संस्था.

ठेवींचा ओघ वाढला

कोरोना काळात बहुतांश बँकिंग व्यवहार ठप्प होते. कर्जवसुलीवर परिणाम झाला असला तरीही ठेवींचा ओघ ओव्हरफ्लो होता. कर्जवाटपही झाले नाही. व्यवसाय सुरू झाल्यानंतर कर्जवसुली होण्याची अपेक्षा आहे. आता कर्जवाटप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता लोकांच्या मानसिकतेनुसार सहकारी बँका व पतसंस्थांना व्यवहार करावे लागतील.

समीर सराफ, एमडी, आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी.

Web Title: Debt recovery stopped; Deposits increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.