लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी वीज कर्मचाऱ्यांनी वीज केंद्र व महावितरणच्या सर्व कार्यालयासमोर निदर्शने केली. वीज कर्मचारी अभियंता संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना या संदर्भात पत्राद्वारे निवेदनही सादर करण्यात आले आहे. वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून जाहीर न केल्यास, येत्या २४ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही त्यातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे सोमवारी महावितरणच्या गड्डीगोदाम व काटोल रोड कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सांगण्यात आले की, कोरोनामुळे राज्यभरात ४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निधन झाले. १,६०० पेक्षा अधिक बाधित झाले. यानंतरही वीज कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यास ३० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये दिले जात आहेत. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा, अब्दुल सादिक, पी.व्ही. नायडू, प्रशांत आकरे, राजेश वैले, स्वप्निल खडतकर, आलोक वाघ आदी उपस्थित होते.