नागपूर : प्रणय प्रकाश ठाकरे या युवकाचा मंगळवारी नायलॉन मांजाने मृत्यू झाला आहे. राज्यात यापूर्वी नायलॉन मांजाने गळा कापल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यात अनेकांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायलॉन मांजाला विनाशकारी घोषित करण्याची मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे.
व्हीटीएचे अध्यक्ष श्रवणकुमार मालू म्हणाले, घटनेचे गांभीर्य पाहून उच्च न्यायालयाने स्वच्छेने जनहित याचिका दाखल केली आहे. पोलीस विभागाने वारंवार विक्री न करण्याचे आवाहन केल्यानंतरही नायलॉन मांजाची विक्री सर्रास सुरू आहे. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, नायलॉन मांजामध्ये पाच किलो वजन उचलण्याची क्षमता असल्याचे एका परीक्षणात दिसून आले आहे. पोलिसांनी पतंग उडविणाऱ्यांच्या धाग्याची तपासणी करावी आणि या जीवघेण्या मांजा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
व्हीटीएने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (बी) अंतर्गत नायलॉन मांजाला विनाशकारी वस्तू घोषित करावी आणि याचे संग्रहण, विक्री व उपयोगकर्त्याला ताब्यात घेऊन कायद्यानुसार दंड करण्याची मागणी केली आहे. विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
व्हीआयएच्या प्रतिनिधी मंडळात उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, सहसचिव, अमरजित सिंग चावला व राजेश कानुनगो उपस्थित होते.