वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:34 AM2020-09-16T01:34:46+5:302020-09-16T01:36:13+5:30

कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे.

Decrease GST on vehicles from 28 to 18 percent | वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

Next
ठळक मुद्देविविध कंपन्यांच्या डीलर्सची मागणी : वाहनांची विक्री वाढणार, शासनाला महसूल जास्त मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरीलजीएसटी कमी करण्याची गरज आहे. सरकारनेजीएसटीचा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला तर वाहन उत्पादकांसोबतच सरकारलाही फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया विविध कंपन्यांच्या डीलर्सनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऑटो संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना वाहनांवरील जीएसटी दर कमी होण्याचे संकेत दिले होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची मागणी पाहता जीएसटी दरामध्ये कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. वाहनांवरील जीएसटी कमी झाल्यास सणांमध्ये फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या वर्षाला २२ दशलक्ष दुचाकी विकल्या जातात. मात्र जर दुचाकी आणि चारचाकीच्या दरात वाढ झाली तर विक्रीवर परिणाम होऊ शकतो.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष काळे म्हणाले, सध्या प्रवासी वाहन आणि दुचाकीवर तब्बल २८ टक्के जीएसटी लागतो. याशिवाय १५०० सीसीच्या वाहनांवर २२ टक्के अधिभार लावला जातो. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत आहे. वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची असोसिएशनची पूर्वीपासून मागणी आहे. आता केंद्रीय स्तरावर याची दखल घेतली आहे. कोरोना काळात वाहनांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यानंतरच्या महिन्यात विक्री वाढली, पण त्या प्रमाणात वाहनांची डिमांड वाढली नाही. अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढून शासनाला महसूलही जास्त प्रमाणात मिळेल. जीएसटीवर २२ टक्के अधिभार आकारण्यात येतो. त्यामुळे लक्झरी कारवर तब्बल ५० टक्के जीएसटी आकारणी होते. त्यामुळे कारच्या किमती वाढतात आणि लक्झरी कारच्या विक्रीवर परिणाम होतो.
टाटा मोटर्सचे डीलर डॉ. पी.के. जैन म्हणाले, चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरील २८ टक्के जीएसटी १८ टक्के करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लक्झरी कारचा विचार केल्यास जीएसटी आणि अधिभार असा एकूण ५० टक्के कर लागतो. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल आणि शासनाला महसूल जास्त मिळेल. तसेच पूर्वीच्या तुलनेत आता डीलर्सला जीएसटीचा भरणा उत्पादन स्तरावर करावा लागतो. त्यामुळे डीलर्सची गुंतवणूक वाढली आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल. टाटा वाहनांना देशस्तरावर मागणी वाढली आहे. जीएसटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी पावले उचलावीत.
पाटणी मारुतीचे महाव्यवस्थापक रवी जोशी म्हणाले, सणांचा सीझन जवळ आला आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये मागणी वाढविण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून कमी करून ते १८ टक्के केले जावेत. मारुतीमध्ये वाढ आहे. रिकव्हर केले आहे. बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.

Web Title: Decrease GST on vehicles from 28 to 18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.