विदर्भात पावसाचा जाेर कमी, चंद्रपुरात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 12:08 AM2021-07-24T00:08:37+5:302021-07-24T00:09:04+5:30

Decreased rainfall in Vidarbha चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.

Decreased rainfall in Vidarbha, constant in Chandrapur | विदर्भात पावसाचा जाेर कमी, चंद्रपुरात कायम

विदर्भात पावसाचा जाेर कमी, चंद्रपुरात कायम

googlenewsNext
ठळक मुद्देसरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक नाेंद : नागपुरात विश्रांती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पावसाने जाेरदार तडाखा दिला तर गाेंदिया जिल्ह्यातही सकाळपर्यंत जाेरदार मुसंडी मारली. विभागातील सहा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक पावसाची नाेंद करण्यात आली.

पूर्व विदर्भात दाेन दिवसांपासून पावसाने चांगलीच कृपादृष्टी केली. सहाही जिल्ह्यात सकाळपर्यंत एकूण ५२.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहरात १२१.९ मिमी तर जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गाेंडपिपरी, वराेरा, सिंदेवाही, राजुरा, काेरपना, बल्लारपूर, जिवती या तालुक्यात धाेकादायक पातळीपेक्षा अधिक पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे गाेंदिया जिल्ह्यात ४७.१ मिमी पावसाची नाेंद झाली. शहरात ९८.४ मिमी नाेंदविला गेला. यानंतर भंडारा २५.९ मिमी, गडचिराेली १६.६ मिमी तर वर्धा जिल्ह्यात ५४.६ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०७२ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मागील वर्षी ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमीची नाेंद झाली असून सरासरीच्या तुलनेत ११२ टक्के आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये अमरावतीत सकाळपर्यंत १९ मिमी, यवतमाळ १९ मिमी, वाशिम ५ मिमी तर अकाेला ५.४ मिमी पावसाची नाेंद झाली.

मागील वर्षीच्या तुलनेत अधिक

नागपूर विभागात २४ तासात २२० मिमी नाेंद झाली. गेल्या वर्षी २३ जुलैपर्यंत ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती, जी सरासरीच्या ९१.८ टक्के हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. जी सामान्यच्या तुलनेत ११२ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के अधिक आहे.

विदर्भातील धरणे ४८ टक्के भरली

तीन दिवसांच्या दमदार पावसाने विदर्भातील काेरडे पडलेले जलसाठे हळूहळू भरायला लागले आहेत. नागपूर व अमरावती विभाग मिळून विदर्भातील सिंचन प्रकल्पात आतापर्यंत ४७.८७ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास ८ टक्क्यांनी कमी असला तरी पावसाचा जाेर बघता लवकरच ही क्षमता गाठण्याची शक्यता आहे. विभागात एकूण १६ मोठे सिंचन प्रकल्प आहेत, ज्यामध्ये ४३०२ दलघमी पाणीसाठी करण्याची क्षमता आहे. याशिवाय मध्यम ४२ तर ३८४ लघुप्रकल्प आहेत, ज्यामध्ये १२७६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. २३ जुलैपर्यंत माेठ्या प्रकल्पात २२७९.९२ दलघमी पाणी साठले आहे, जे ४३.५७ टक्के आहे. मागील वर्षी या काळात ५६.५ टक्के पाणी भरले हाेते. अमरावती विभागात २५ माेठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये २९५३.८८ दलघमी जलसाठा करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत १८००.४३ दलघमी पाणी जमा झाले आहे, जे ५२.१७ टक्के हाेते. गेल्या वर्षी या काळापर्यंत ते ५३ टक्के हाेते. नागपूर जिल्ह्यातील ठाणा लघुसिंचन प्रकल्प गुरुवारी १०० टक्के भरला. वरोरा येथील चंदई मध्यम प्रकल्प, नागभीड येथील चिंधी लघु प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. चिमूरमधील गिरगाव व गडचिरोलीतील मामा तलावदेखील पूर्ण भरले आहेत.

Web Title: Decreased rainfall in Vidarbha, constant in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.