मेयोतही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘दीनदयाल थाळी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:26 PM2018-03-17T23:26:53+5:302018-03-17T23:27:07+5:30
श्री सालासर सेवा समितीच्यावतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पं. दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण रविवार १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमातून रोज ८०० जणांना केवळ १० रुपये सेवाशुल्कात भोजन उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सालासर सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम सारडा यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री सालासर सेवा समितीच्यावतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पं. दीनदयाल थाळी’ उपक्रमाचे लोकार्पण रविवार १८ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमातून रोज ८०० जणांना केवळ १० रुपये सेवाशुल्कात भोजन उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती सालासर सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम सारडा यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, सालासर सेवा समितीचे सचिव मांगीलाल बजाज, कोषाध्यक्ष वासुदेव मालू, सहसचिव घाशीराम मालू आदी उपस्थित होते.
मांगीलाल बजाज म्हणाले, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्स समोरील जागा समितीला भोजन वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात एकाचवेळी १२५ रुग्णांचे नातेवाईक भोजन करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या दोन नातेवाईकांना ‘पं. दीनदयाल थाळी’चे कूपन दिले जाईल. सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ वाजेपासून ते रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत अशा दोन वेळेत भोजन दिले जाईल. दोन्ही वेळच्या भोजनात पोळी, भाजी, भात, वरण, लोणचे असेल. विशेष म्हणजे, नातेवाईकांना पोटभर जेवण दिले जाईल. यांच्या सेवेत २५ कार्यकर्ते राहतील, असेही ते म्हणाले.
-पुढील तीन महिन्यात मेयोचे पाकगृहही अद्ययावत
अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी एका प्रश्नाचा उत्तरात म्हटले, मेयोची रुग्ण संख्या ५९० वरून वाढून ८०० वर पोहचली आहे. यामुळे जुने पाकगृह अपुरे पडत आहे. जुन्या वॉर्ड क्रमांक १२ ला अद्ययावत पाकगृहाचे स्वरुप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील तीन महिन्यात रुग्णाच्या सेवेत हे पाकगृह असेल.