लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल रोडवरील मिलिटरी फायरिंग एरियातून वस्तीकडे येणारी हरणं सध्या धोक्यात आहेत. या परिसरातील अनेक हरिणांची भटक्या कुत्र्यांकडून शिकार होते. पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी हरणं गावाकडे पळत सुटतात. अशाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये स्थानिक नागिरकांनी दोन हरिणांना शनिवारी सकाळी जीवदान दिले.
या घटना काटोल रोडवरील मकरधोकडा परिसरात अगदी सकाळी घडल्या. पहिली घटना मकरधोकडा येथील गणराज लॉनजवळ सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. एका मोठ्या ठिबकेदार नर हरिणाचा मिलिटरी फायरिंग कँप परिसरातील जंगलात कुत्र्यांनी पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी ते पळत सुटले, थेट मकरधोकडा वस्तीकडे आले. महामार्गालगत असलेल्या गणराज लॉनजवळ तारेचे कंपाऊंड असल्याने त्याला पुढे पळता आले नाही. कुत्रे पाठलाग करीतच होते. अशातच जवळच असलेल्या एका कारच्या उघड्या दारातून ते आत शिरले. हा प्रकार किशोर गायधने यांच्या लक्षात घेताच त्यांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. अन्य नागिरकांनी धाव घेऊन कारमधून हरिणाला बाहेर काढले. ते किरकोळ जखमी झाले होते. त्याला उचलून बाजूला ठेवले. पाणी पाजल्यावर ते थोडे शांत होताच काही वेळाने ते जंगलाकडे पळून गेले. दरम्यानच्या काळात वन विभागाला नागिरकांनी माहिती दिली. मात्र पथक येण्याच्या आधीच हरीण निघून गेले होते.
दुसरी घटना काटोल मार्गालगतच्या एका काॅन्व्हेंटमध्ये सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. बंद असलेल्या या इमारतीमध्ये एक हरीण कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी शिरले. मात्र, त्याला बाहेर पडता येत नव्हते. नागिरकांच्या लक्षात घेताच मोठी गर्दी झाली. त्यामुळे ते अधिकच बावरले. वनविभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. अखेर नागरिकांच्या मदतीने कॉन्व्हेंटच्या कंपाऊंडचे कुलूप उघडून गेट खोलल्यावर मार्ग मिळाला. त्याला बाहेर पडता यावे यासाठी सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती. गेटबाहेर येताच त्यानेही जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
हरीण वाढले, गोरेवाडाचा मार्ग बंद
मिलिटरी फायरिंग एरियाच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर हरिणांची संख्या वाढली आहे. लागूनच गोरेवाडाचे जंगल असले तरी कंपाऊंडमुळे या हरिणांना पलीकडे जाता येत नाही. मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांकडून हरिणांच्या शिकारीच्या आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्याचे गावकरी सांगतात. जीव वाचविण्यासाठी ही हरणे वस्तीकडे येतात. मागील १५ दिवसांपूर्वी बेवारस कुत्र्यांनी एका हरिणाला पकडल्याची घटना घडली होती.