कामठी : वाट भरकटलेल्या हरणावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके ताेडलेल्या त्या हरणाचा पुढे मृत्यू झाला. ही घटना कामठी शहरातील छावणी परिसरात साेमवारी (दि. ८) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
कामठी शहरातील छावणी भागात असलेल्या सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात माेठ्या प्रमाणात झुडपी जंगल असून, त्या जंगलात हरणांचा वावर आहे. कळपातील हरीण पाणी पिण्यासाठी या भागातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्राच्या दिशेने आले. त्यातच ते हरीण वाट भरकटले आणि त्याच्यावर माेकाट कुत्र्यांची नजर पडली. त्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने ते सैरावैरा पळू लागले. ते कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याने कुत्र्यांनी लचके ताेडून त्याला गंभीर जखमी केले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी लगेच पाेलिसांसह वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. पाेलीस व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठेपर्यंत हरणाचा मृत्यू झाला हाेता. त्यांनी मृत हरणाला ताब्यात घेत पंचनामा केला. या भागात यापूर्वीही कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या भागातील वन्यप्राण्याचा जीव धाेक्यात आला आहे.