बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल : नागपुरातील मानकापूर ठाण्यात गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:11 PM2020-05-12T22:11:05+5:302020-05-12T22:13:53+5:30
जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल करून कुणाल हॉस्पिटल प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कुणाल हॉस्पिटल प्रशासनाने मानकापूर ठाण्यात हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सय्यद अशरफ नामक आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल करून कुणाल हॉस्पिटल प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे कुणाल हॉस्पिटल प्रशासनाने मानकापूर ठाण्यात हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सय्यद अशरफ नामक आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.
९८२३६२०४०९ या मोबाईल क्रमांकावरून (फेसबुकवरून) एक व्हिडिओ ९ मे रोजी व्हायरल करण्यात आला. या हॉस्पिटलमध्ये एका तासात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगून गोंधळ केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींनी हा प्रकार कुणाल हॉस्पिटलमधला असल्याची अफवा पसरवली. इस्पितळाच्या संचालकांनी तपासणी केली असता आरोपी सय्यद अशरफ याने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टर शिशिर श्रीवास्तव यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. आरोपी सय्यद याने हॉस्पिटलची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. यामुळे हॉस्पिटलची बदनामी झाली आणि मोठे आर्थिक नुकसान झाल्याचाही उल्लेख त्यांनी तक्रारीत केला. त्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी एनसीची नोंद केली. दोन दिवस होऊनही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे आपण आज वरिष्ठांशी बोलणी केली. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन आपल्याला दिल्याचे डॉ. शिशिर श्रीवास्तव यांनी सांगितले.