फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:51 AM2019-11-12T00:51:01+5:302019-11-12T00:52:27+5:30
‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्स व जर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्स व जर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले. ‘मेट्रो’च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रान्स सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फे नेमण्यात आलेली समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आली आहे. या समितीने ‘नागपूर मेट्रो’च्या प्रवासी मार्गाचे निरीक्षण करत व्यावसायिक स्टेशनची पाहणी केली व विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे, तसेच तांत्रिकी,वित्तीय आणि ‘इएसएचएस’ दृष्टिकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौºयाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या समितीतील प्रतिनिधींनी सिव्हील लाईन्स, स्थित मेट्रो हाऊस येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली व प्रकल्पासंदर्भात विस्तुत चर्चा केली. डॉ. दीक्षित यांनी प्रकल्पाच्या भौतिक आणि वित्तीय प्रगती तसेच मेट्रोद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती शिष्टमंडळाला दिली. चर्चेदरम्यान जर्मनी आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोद्वारे, राबविण्यात येत असलेल्या ‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’, ‘ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ (टीओडी), ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’, ‘फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’,‘फीडर सर्व्हिस’ तसेच सोलर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेतला व मेट्रोच्या संपूर्ण कार्यावर समाधान व्यक्त केले.
या शिष्टमंडळात के.एफ.डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक क्रिस्टीयन वोस्लर, तांत्रिक तज्ञ पीटर रुनी, सेफगार्ड तज्ज्ञ जुटा वोल्मर, सेफगार्ड तज्ञ सविता मोहन राम,वरिष्ठ क्षेत्र तज्ञ स्वाती खन्ना तसेच ए.एफ.डी. फ्रान्सचे भारतातील व्यवस्थापक ब्रुनो बोसल, सेफगार्ड तज्ज्ञ सिल्वेन बर्नाड-श्रीनिवासन, प्रकल्प व्यवस्थापक रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. तसेच महा मेट्रोच्या वतीने संचालक(प्रकल्प) महेश कुमार,संचालक (रोलिंग स्टॉक) महेश सुनील माथुर, संचालक(वित्त) एस.शिवमाथन, संचालक (प्रकल्प नियोजन) रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक(प्रशासन) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.