गळणारे छत, शेवाळं असलेल्या भिंतींच्या कक्षात होते प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:45 AM2019-07-29T11:45:07+5:302019-07-29T11:47:57+5:30
‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे.
सुमेध वाघमारे/
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव, रक्तदाबाशी निगडित समस्या आणि जंतुदोष (सेप्सिस) ही मातामृत्यूंची प्रमुख कारणे आहेत, तर दुसरीकडे ‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे. मात्र मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला या बाबीचे काहीही सोयरसुतक नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गळणारे छत, शेवाळ लागलेल्या भिंती, कोंदट वातावरण असलेल्या अस्वच्छ प्रसुती कक्षात महिलांची प्रसुती केली जात आहे. मनपाचा आरोग्यबाबतच्या अनास्थेला गंभीरतेने घेतो कोण, असा प्रकार सुरू आहे.
शासन एकीकडे मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना अमलात आणत आहे. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. परंतु नागपुरकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाला याचा विसर पडला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातच असुरक्षित बाळंतपण केले जात असल्याचे सामोर आले आहे. या रुग्णालयात ७५ खाटा आहेत. यातील ३० खाटा स्त्री रोग व प्रसुती विभागासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या सेवेत चार स्त्री रोग तज्ज्ञ व एक बालरोग तज्ज्ञ आहे. रुग्णालयाच्या देखभालीवर व डॉक्टरांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च होत असताना साधे प्रसुती कक्ष दुरुस्त होत नसल्याने आश्चर्य आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या अधिकाºयाचेच रुग्णालयाच्या विकासकामाकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
महिन्याकाठी १० वर प्रसुती
रुग्णालयातील तळमजल्यावर स्त्री रोग व प्रसुती विभागाचा बाह्यरुग्ण विभागातच प्रसुती कक्ष आहे. या कक्षाचे छत गेल्या कित्येक वर्षांपासून गळत आहे. भिंती ओलावा पकडून ठेवत असल्याने शेवाळ लागले आहे. विद्युत व्यवस्थेची पुरेशी सोयही नाही. जंतु संसर्गाचा धोका असलेल्या या कक्षात महिन्याकाठी १०वर प्रसुती होतात. गेल्या चार-पाच वर्षापासून याच स्थितीत हा कक्ष असल्याने रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या अधिकाºयाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
प्रसूत माता व अर्भकांचा जीव धोक्यात
प्रसूती कक्षाचे सर्व निकष धाब्यावर बसून माता व अर्भकाचा जीव धोक्यात आणणाºया या कक्षात गेल्या तीन वर्षात ५६७ प्रसूती झाल्या. २०१६-१७ मध्ये १६८, २०१७-१८ मध्ये १८०, २०१८-१९मध्ये २०२ तर एप्रिल व मे या दोन महिन्यात १७ प्रसूती झाल्या आहेत. या प्रकारामुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा उद्देश बाळगून असलेल्या मनपाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.