लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुक्रवारी डेंग्यू संशयित युवतीच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या चमूने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. उपराजधानीत डेंग्यू वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागासह, महानगरपालिका व नागरिकांकडूनही होणारे प्र्यत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.प्राचिता चंद्रभान आंबिलडुके (१७) रा. खात असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, प्राचिता बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या सात-आठ दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने तिला भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे शुक्रवारी प्राचिता हिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसादिवशीच तिची अंत्ययात्रा निघाल्याने गावात शोककळा पसरली. प्राचिताचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी डॉक्टरांनी लक्षणावरून संशयित डेंग्यू म्हणून नोंद केली आहे. आरोग्य विभागाच्या चमूने प्राचिताचे नमुने ताब्यात घेतले असून डेंग्यूच्या तपासणीसाठी पाठविले आहे. २४ तासानंतर अहवाल येण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागात ११ रुग्णनागपूर ग्रामीण भागात आतापर्यंत ११ रुग्णांची तर शहरात २१ असे मिळून जिल्ह्यात ३२ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी जागोजागी साचलेले आहे. यातच पावसाच्या उघडझापमुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे येत्या काळात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाडी परिसरात डेंग्यू वाढणारप्राप्त माहितीनुसार, वाडी परिसरातील उघड्या नाल्या, खोलगट भागात साचलेले पाणी, उघड्यावरील भंगार व्यवसाय व त्यांच्याकडे टायरचा असलेला ढीग यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्ण खासगीमध्ये उपचार घेत असल्याने आरोग्य विभागाकडे त्याची नोंद नाही. परंतु, सोमवारी येथील तीन रुग्ण लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.