लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : तालुक्यात काेराेना संक्रमण कमी असले तरी, प्रशासनाने गाफील न राहता संसर्गजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी डाॅ. शिवनंदा लंगडापुरे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी काेराेनाबाधित रुग्ण व लसीकरणाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी २ एप्रिल राेजी भिवापूर येथे भेट देऊन काेराेना रुग्ण व लसीकरण माेहिमेचा आढावा घेतला हाेता. यावेळी त्यांनी आवश्यक उपाययाेजनांबाबत संबंधितांना सूचना दिल्या हाेत्या. त्यानंतर आता उपजिल्हाधिकारी डाॅ. शिवनंदा लंगडापुरे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नांद, कारगाव, शिवापूर, सरांडी, पाहमी आदी ग्रामपंचायतींना त्यांनी भेट दिली. यावेळी सहायक खंडविकास अधिकारी राेशनकुमार दुबे, आराेग्य विस्तार अधिकारी सुनील महतकर, सरपंच तुळशीराम चुटे, माधुरी दडवे तसेच ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित हाेते. काेराेनाबाधित रुग्ण, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, कन्टाेन्मेंट झाेन यासह काेविड लसीकरण माेहिमेबाबत सविस्तर आढावा घेत उपजिल्हाधिकारी डाॅ. लंगडापुरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. लसीकरण केंद्रांना भेट देत ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.