‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:38 AM2018-03-08T10:38:44+5:302018-03-08T10:38:50+5:30

अवघ्या २४ वर्षांच्या रितू मल्होत्रा हिची यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थिनी व तरुणींना प्रेरणा देणारी आहे.

'Design It In Smart Way'; Ritu Malhotra | ‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

googlenewsNext
ठळक मुद्देरतन टाटांनी थोपटली रितू मल्होत्राची पाठ

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वडिलांचे छत्र डोक्यावर नसतानादेखील ती खचली नाही. मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने शिकण्यावर लक्ष केंद्रित केले. इतर अभियंत्यांसारखा तिलादेखील सहजपणे चांगल्या ‘पॅकेज’चा ‘जॉब’ लागला असता. मात्र ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’चा सुवर्णमध्य साधून स्वत:ला सिद्ध करण्याचा तिने संकल्प केला आणि झपाट्याने कामाला लागली.आज तिची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली असून देशातील अग्रणी उद्योगपती रतन टाटा यांनी खुद्द तिची पाठ थोपटली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या रितू मल्होत्रा हिची यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थिनी व तरुणींना प्रेरणा देणारी आहे.
मोठ्या भावाच्या कामामध्ये मदत करत असताना तिने चक्क संकेतस्थळ ‘डिझाईन’ करण्यास सुरुवात केली. याशिवाय संगणकाशी संबंधित कामांचे ‘फ्रीलान्सिंग’ करून तिने शिक्षणाचा खर्च उचलला. या कार्यात तिला मोठा भाऊ प्रतीक मल्होत्रा व प्रतीक हरडे यांचे पाठबळ होतेच. तिने ‘डिजिटल अ‍ॅक्वारिअम’ची निर्मिती केली. यात मानवी हस्तक्षेपाशिवाय सुमारे ३० दिवसांपर्यंत माशांना अन्न देणे, पाणी शुद्ध करणे, स्वच्छता करणे ही कामे केली जाऊ शकतात. या शोधाचे ‘पेटंट’ मिळावे यासाठी तिने अर्ज केला आहे. या शोधानंतर तिने ‘डिजिटल प्लँटर’ हा नवा शोध लावला. घरात एखादे झाड लावल्यानंतर वर्षभरदेखील त्याला पाणी, खत, प्रकाश उपलब्ध करू शकणारी प्रणाली यात वापरण्यात आली आहे. या कुंडीला बसविण्यात आलेल्या यंत्रामुळे तेथील झाडाला रोज पाणी किंवा खत देण्याचे काम हे यंत्र स्वत:च करणार आहे. यात अगदी ‘ब्ल्यू टूथ’, गाणे ऐकण्याची सोयदेखील आहे. याची माहिती केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकेतस्थळावर जाहीर होताच अनेक ‘सेलिब्रिटी’ व नामवंतांनी याचा वापर सुरू केला. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्या व संशोधकांनीही तिच्या कार्याचे कौतुक केले आहे. आपला देश ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये ६८ व्या स्थानावर आहे. देशाची प्रगती घडवायची असेल तर संशोधनावर जास्त भर दिला पाहिजे. विशेषत: तरुणी तर याबाबतीत विशेष कार्य करू शकतात, अशी भावना तिने व्यक्त केली.
रितू, प्रतीक मल्होत्रा व प्रतीक हरडे यांनी ‘स्मार्ट कूलर’ची निर्मिती केली आहे. अवघ्या दोन लिटर पाण्यामध्ये दिवसभर चालू शकणाऱ्या या ‘स्मार्ट’ व ‘इकोफ्रेंडली कूलर’ची चर्चा रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये तिला सहभागी होण्यासाठी निमंत्रण आले होते. यावेळी रतन टाटा यांनी रितूला स्वत:हून आवाज देऊन बोलावून घेतले व तिच्या संशोधनाबाबत जाणून घेतले. महिलांची शक्ती खऱ्या अर्थाने दिसून येत असून तू अशीच मेहनत कर असा सल्ला त्यांनी तिला दिला. तसेच या शोधाबाबतचा प्रस्तावदेखील त्यांनी मागवून घेतला.

Web Title: 'Design It In Smart Way'; Ritu Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.