नागपूर : तो जन्मापासून मूकबधिर आहे. आई दहा वर्षांपूर्वीच वारली. अशा परिस्थितीत वडिलांनीच त्याचा सांभाळ केला. मूकबधिर शाळेत तो शिकू लागला. यातच त्याची दृष्टीही हळूहळू जाऊ लागली. अगदीच कमी दिसते. अशा परिस्थितही त्याने यंदा दहावीचा गड सर केला. मो. फारुख असे या विद्यार्थ्याचे नाव. फारूखच्या या यशाचे, त्याच्या या जिद्दीचे शाळेतील शिक्षकांनाही मोठे कौतुक आहे.
मो. फारूख हा शंकरनगर येथील मूकबधिर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी. त्याचे वडील मो. हारुन हे अंसारनगर, मोमीनपुरा येथे राहतात. कपडे शिवून विकण्याचे काम ते करतात. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. मो. हारून यांना तीन मुलं. मोठी मुलगी व्यवस्थित असून, तिचे लग्न झाले तर लहान मुलगीसुद्धा जन्मजात मूकबधिर आहे. दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. त्यामुळे वडिलांनीच त्यांचा आई बनून सांभाळ केला. मुलगा शिकला तर आपल्या पायावर उभा राहू शकेल, या उद्देशाने त्यांनी मुलाला शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयात टाकले. परंतु, त्यांच्या जीवनातील संकटे अजून टळली नव्हती. फारुखची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. त्याला काही दिसेनासेच झाले. परंतु, त्याने जिद्द सोडली नाही. शाळेतील शिक्षकांनीही त्याची मदत केली. मो. फारूख याची जिद्द आणि त्याच्या शिक्षकांच्या सहकार्याने त्याने दहावीचा गड सर केला.
मुलगा दहावी पास झाला याचा आनंद आहेच. परंतु, त्याची दृष्टी परत आली तर खूप बरे होईल. देशात मोठमोठे डॉक्टर आहेत. कुणी मुलाच्या मदतीसाठी पुढे आले तर त्याला पुढे शिकता येईल. आपल्या पायावर उभे राहता येईल. माझ्या मुलीलाही मला पुढे शिकवता येऊ शकेल, तेव्हा मुलाची दृष्टी परत यावी, इतकीच अपेक्षा आहे.
मो. हारुन - वडील