कोरोनामुक्त गावासाठी १०० टक्के लसीकरणाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:24+5:302021-04-08T04:09:24+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. ...
कळमेश्वर : कळमेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सरपंचांची तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. तीत उपस्थितीत सरपंचांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी कोविड लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला. ४५ वर्षे वयोगटावरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. कोविड लसीबाबत जनजागृतीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंचांशी साधलेला संवाद.
-------
ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात येत असून, लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहे. आतापर्यंत गावातील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ग्रामस्थांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठीसुद्धा व्यवस्था करण्यात येत आहे.
दीपाली वऱ्हाडे
सरपंच, मोहगाव सावंगी
------------------------------------------
गावातील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सध्या ४५ वर्षे वयोगटातील १५ ते २० टक्के नागरिक बाधित आहेत. संक्रमण कालावधी संपल्यानंतर त्यांचेही लसीकरण केले जाईल. घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
दिलीप डाखोळे
सरपंच, वरोडा
--
गावात जनजागृती करण्यात येत असून, आतापर्यंत ६० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ज्यांच्याकडे लसीकरण केंद्रावर जाण्याची व्यवस्था नाही, त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंगेश गोतमारे, सरपंच, घोराड
--
कोविड लसीबाबत ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्यात येत आहे. घरोघरी जाऊन लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
नीता तभाने, सरपंच सांवगी
--
कोविड लसीबाबत काही लोकांनी गैरसमज पसरविले. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत गावातील ६० टक्के ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे.
साहेबराव डेहनकर
उपसरपंच, लोणारा
-
गावात ८० टक्के लसीकरण झाले आहे. दोन दिवसांत १०० टक्के लसीकरण होईल. लसीकरणासाठी व्यापकस्तरावर जनजागृती सुरू आहे.
सचिन निंबाळकर, सरपंच, खैरी लखमा
--
गावात ७५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पुढील तीन दिवसांत ४५ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल.
सोनू आवारी, सरपंच, खापरी उबगी
-
कोविड लसीकरणाबाबत घरोघरी जाऊन जनजागृती सुरू आहे. सध्या ७० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
प्रमोद नेगे, सरपंच, आष्टीकला