लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 04:21 PM2022-05-21T16:21:52+5:302022-05-21T16:42:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
नागपूर : भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्ष जी लांगूल चालनीची नीती काँग्रेस पक्षाने भारतात आणली त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पुढे बोलताना, ही दुफळी दूर करून आपण सगळे एका भारतमातेचे पूत्र आहोत अशाप्रकारची भावना देशात तयार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देत आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
...तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं
कोर्टाने दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये नवाब मलिक यांचा 'डी गँग'शी संबंध असल्याचे म्हटले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. पण या सरकारचं बघा, इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठलीच धडपड करत नाही. ओबीसी आरक्षणासाठी कुठलीच धडपड करत नाही. मात्र, त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. यापेक्षा अर्धी धडपड जर ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.
डी गँगशी नवाब मलिकांचे असलेले संबंध या आरोपपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र त्यानंतरही सरकार त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही ते मंत्रीमंडळात असून मुख्यमंत्र्यांना 'डी गँग'शी संबंधित मंत्र्यांबरोबर काम करायचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.