लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. दीक्षाभूमीवर होणारा ऐतिहासिक सार्वजनिक सोहळाही यंदा होणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नागरिकांनी महामानवास डिजिटल अभिवादनाचा संकल्प केला आहे. कोरोना काळात कुठेही गर्दी न करता आंबेडकर जयंती व बुद्ध जयंती ज्या उत्साहात साजरी झाली त्याच धर्तीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनसुद्धा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन कार्यक्रमांवर भर दिला जात आहे.
ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीद्वारा संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमीतर्फे २३ व २४ तारखेला ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. थायलंड येथील पूज्य भन्ते दीपरत्न हे या चर्चासत्राचे उद्घाटन करतील. स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षस्थानी राहतील. तर माजी कुलगुरू डॉ. आर.के. काळे, डॉ.वाय. एस. अलोणे, स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, डॉ.सोनाझिरया मीन्झ, प्राचार्य डॉ. बी.ए. मेहरे प्रमुख अतिथी राहतील.
यासोबतच आवाज इंडिया टीव्हीतर्फे २३ ते २५ ऑक्टोेबर दरम्यान ऑनलाईन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणारआहे. यात सम्यक संवाद, संभाषण, स्पेशल स्टोरीज व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. लेह-लडाख येथील भदन्त संघसेन हे अध्यक्षस्थानी राहतील. तर उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे हे प्रमुख अतिथी राहतील. याशिवाय विविध संघटनांतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ऑनलाईन घेतले जात आहेत. यासोबतच समता सैनिक दलासह अनेक संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.