ड्रेसच दिला नाही अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या! चालक, वाहकांना कारवाईची तंबी : एसटी महाव्यवस्थापकांचे विभाग नियंत्रकांना पत्र

By नरेश डोंगरे | Published: March 30, 2023 08:15 PM2023-03-30T20:15:21+5:302023-03-30T20:15:29+5:30

अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा.

Didn't give a dress, and said wear a clean dress! Action notice to drivers, carriers: ST General Manager's letter to Divisional Controllers | ड्रेसच दिला नाही अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या! चालक, वाहकांना कारवाईची तंबी : एसटी महाव्यवस्थापकांचे विभाग नियंत्रकांना पत्र

ड्रेसच दिला नाही अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या! चालक, वाहकांना कारवाईची तंबी : एसटी महाव्यवस्थापकांचे विभाग नियंत्रकांना पत्र

googlenewsNext

नागपूर : एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, गेल्या चार वर्षापासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेषच (ड्रेस) देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक वाहक (ड्रायव्हर, कण्डक्टर) सेवारत आहेत. अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना एसटीच्या चालक वाहकांना गणवेष देण्यात आला. त्यावर ठिकठिकाणी रेडिअम, डिझाईन असल्याने हा गणवेष टीका वजा चर्चेचा विषय ठरला होता.

महिला चालक वाहकांचा गणवेष शाळकरी मुलींसारखा दिसत असल्याचीही ओरड झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मात्र हजारो चालक-वाहकांना गणवेषच मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश चालक वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात. काही जण नेम प्लेट, बॅज (बिल्ला) अन् लायसेन्सही जवळ बाळगत नसल्याचे ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर, एसटीचे (वाहतूक) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून 'जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा', असे आदेश दिले आहेत. या कारवाईची स्वतंत्र नोंद करून ती महाव्यवस्थापक कार्यालयाला कळवा, असेही या आदेश वजा पत्रात नमूद आहे.

नंतरच आदेश लागू करा : कर्मचारी, संघटना
शिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला शासकीय गणवेष घालायलाच हवा. मात्र, गणवेषच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते, असे प्रश्न चालक, वाहकांकडून उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन गणवेष द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केली आहे.

लवकरच नवीन गणवेष : महाव्यवस्थापक जगताप

नवीन गणवेष देण्यासंबंधाने महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महिनाभरातच एसटीच्या चालक, वाहकांना नवीन गणवेष मिळणार आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी आहेच. मात्र, शिस्त आणि चांगुलपणाही महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी यासंबंधाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Didn't give a dress, and said wear a clean dress! Action notice to drivers, carriers: ST General Manager's letter to Divisional Controllers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर