भिवापूर : तालु्क्यातील काहीभागात शेतातील उभा हराभरा नुकसानीच्या तावडीत सापडला आहे. जमिनीतील बुरशीमुळे हरभरा पिकावर मर आणि मुळकजने हल्लाबोल केला असून, पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
खरिपाच्या हंगामात शेतातील उभ्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर, परतीच्या पावसानेही पिकांसह शेत-शिवार धुऊन काढले. वन्यप्राण्यांच्या उन्मादाने उभी पिके पायदळी तुडविली गेलीत. यामुळे तालुक्यात सोयाबीन, कापूस, धानासह मिरची आदी हातात आलेल्या पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता ढासळली. अशात शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा शेतात उभ्या होणाऱ्या हरभरा पिकावर आहेत. मात्र, गत आठवडाभरापासून बुरशीमुळे हराभरा पिकावर मर आणि मुळकूजचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तालुक्यातील वाकेश्वर, नक्षी, जवळी आदी परिसरात याचे प्रमाण अधिक असून, प्रादुर्भावामुळे हरभरा वाळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहे. वाकेश्वर येथील शेतकरी संजय गावंडे यांच्या शेतातही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करत, आवश्यक त्या उपाय योजनांचे मार्गदर्शन केले आहे.