लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेमध्ये नव्या तंत्रामुळे आधुनिकीकरणाला गती आली आहे. पूर्वीचे वाफेवरचे इंजिन कालबाह्य होऊन डिझेल इंजिन आले. आता ते सुद्धा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळात ९० टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मंडळात फक्त ११ डिझेल इंजिन उरले आहेत.डिझेल इंजिनमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होत असे. पैसा आणि वेळही वाया जात असे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वे विभागाकडून विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील बहुतेक मार्गावरील विद्युतीकरणाची कामे पूर्णत्वास आली आहेत. पिंपळखुटी, आदिलाबाद आणि वणी या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वे धावतील. परिणामत: टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनचा वापर बंद होत जाईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावरही डिझेल इंजिन नेहमीसाठी बंद केले जाणार नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून त्याचा वापर होणार आहे. पहाडी क्षेत्रात आजही रेल्वेसाठी डिझेल इंजिनचा उपयोग केला जात आहे.
मध्य रेल्वे नागपूर मंडळात विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. वणी, पिंपळखुटी, आदिलाबादमध्येही ही काम वेगात सुरू आहे. यानंतर इंजिनचा उपयोग कमी होईल, परंतु वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्याचा उपयोग होईलच.- एस.जी. राव, सहायक वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ