‘मतभेद’ असणाऱ्या साहित्यिक-संस्थांचे ‘मनभेद’ चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:43 AM2019-11-28T11:43:23+5:302019-11-28T11:47:26+5:30

विदर्भ संशोधन मंडळाचे द्विदिवसीय राष्ट्रीय अन्य मराठी साहित्य संमेलन २३ व २४ नोव्हेंबर रोजी पार पडले, तर मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाच्या नागपूर शाखेद्वारे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर रोजी पार पडले.

Differences between authors come forward | ‘मतभेद’ असणाऱ्या साहित्यिक-संस्थांचे ‘मनभेद’ चव्हाट्यावर

‘मतभेद’ असणाऱ्या साहित्यिक-संस्थांचे ‘मनभेद’ चव्हाट्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे द्विदिवसीय साहित्य संमेलनात खुर्च्या रिकाम्याएकतेचे धडे देणारेच गिरवीत आहेत ‘एकला चलो रे’ची भूमिका

प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शृंगार, सामाजिक जाणिवा, क्रांती, इतिहास आणि प्रबोधनाचे डोज पाजणाºया साहित्यिकांमध्ये कायम मतभेद असतात, हे सिद्ध करण्याची गरज नाही. वैचारिकदृष्ट्या भिन्न प्रवाहांचे उद्गाते आणि अशा गटांचे नेतृत्व साहित्यिकच करीत असतात. त्यामुळे मतभेदासोबतच त्यांच्यात कमालीचे मनभेद असतात, हे स्पष्टच आहे. आपल्या विचारांना जाहीरपणे प्रकट करण्याचे व्यासपीठ असणाºया संमेलनाला हे सगळे एकत्र येत असतात, हेही तेवढेच खरे आहे. असे असतानाही, संमेलनात खुर्च्या रिकाम्या असल्याने, त्यांच्यातील मनभेद तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत. ही खदखद नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या एक आणि द्विदिवसीय साहित्य संमेलनातून उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही संमेलने राज्यस्तरीय होती.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून नागपुरात दोन राज्यस्तरीय साहित्य संमेलने पार पडली. विदर्भ संशोधन मंडळाचे द्विदिवसीय राष्ट्रीय अन्य मराठी साहित्य संमेलन धरमपेठेतील वनामतीच्या सभागृहात २३ व २४ नोव्हेंबर रोजी पार पडले, तर मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाच्या नागपूर शाखेद्वारे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर रोजी राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात पार पडले. या दोन्ही साहित्य संमेलनाला साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा झरा आटलेलाच दिसून आला. जणू ही संमेलने केवळ संस्थात्मक सदस्यांसाठीचीच होती की काय, असा संशय निर्माण होत होता. या दोन्ही संमेलनात जुने साहित्य संचित आणि नवी साहित्यनिर्मिती या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. साहित्य निर्मितीचा झरा आटलेला आहे, त्याचे आधुनिक कारण आणि लोकसाहित्याकडे होत असलेले दुर्लक्ष... हे विषय या दोन्ही संमेलनातील विविध चर्चासत्रांतून विशेषत्वाने उल्लेखित झाले. मात्र, हे चर्चासत्र होते कुणासाठी? या प्रश्नाचे उत्तर दोन्ही साहित्य संमेलनात असलेल्या रिकाम्या खुर्च्यांवरून कुठलाही आटापिटा न करता सहजच मिळत होते. समाजातील सामान्य घटकांप्रमाणे साहित्यिकांमधील दुसऱ्यांचे ऐकण्याची वृत्ती, संयम खुंटत असल्याचेच ‘रिकाम्या खुर्च्या’ हे प्रतीक ठरले.
अनेकांनी मारली दांडी
या दोन्ही साहित्य संमेलनाला अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी दांडीच मारली. नागपूर आणि विदर्भात राष्ट्रस्तरावर नावाजलेले अनेक साहित्यिक आहेत. काही जणांनी महामंडळांसारख्या संस्थांचे नेतृत्वही केले आहे, तर काहींचा शब्द सर्वांसाठी प्रमाण असतो, अशीही मान्यवर मंडळी आहे. मात्र, दांडी मारण्याचे पातक त्यांच्याकडून झाले आणि साहित्य क्षेत्रात याबाबत नव्या दमाच्या युवकांमध्ये उदासीनता पसरली गेली आहे.
साहित्यिकांना संशोधनात रस नाही
विदर्भ संशोधन मंडळाच्या द्विदिवसीय साहित्य संमेलनात लोकसाहित्य आणि ललितसाहित्य या विषयांना केंद्रस्थानी घेतले गेले होते. मात्र, साहित्यिकांना लोकसाहित्यात रस नसल्यानेच या संमेलनाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचे अनेकांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट झाले.
मग, यांना बोलण्याचा अधिकार आहे का?
लहान साहित्य संमेलनात मोठ्यांनी येऊ नये आणि याच मोठ्यांना ऐकण्यासाठी गर्दी होत नसल्यावरच हेच मोठे मान्यवर अनुपस्थितांच्या नावाने बोटे मोडत असल्याचे अनेकदा जाहीर व्यासपीठावरून दिसून आले आहे. आता स्वत:च अशा संमेलनाला दांडी मारत असतील, तर मग यांना बोलण्याचा अधिकार तरी कुठला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Differences between authors come forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.