२५ रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल मॅप'; वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहिती उपलब्ध

By नरेश डोंगरे | Published: April 25, 2024 09:41 PM2024-04-25T21:41:26+5:302024-04-25T21:42:37+5:30

आता रेल्वे प्रवाशांना ढूंडो ढूंडो रे... करावे लागणार नाही.

digital map at 25 railway stations information about various facilities including waiting room available | २५ रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल मॅप'; वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहिती उपलब्ध

२५ रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल मॅप'; वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहिती उपलब्ध

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हे कुठे आहे, ते कुठे आहे, असे विचारत फिरण्याची किंवा ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांवर येणार नाही. होय, नागपूर रेल्वे स्थानकासह विभागातील २५ स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी डिजिटल मॅप (नकाशा)ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील १७ स्थानकांवर सुविधा कार्यान्वित झाली आहे.

बाहेरगावाहून आलेल्या बहुतांश प्रवाशांना वेटिंग रूम, तिकीट काउंटर लिफ्ट, पोलिस स्टेशन आदींसह अनेक सेवांची माहिती नसते. त्यामुळे प्रवासी मदत (चाैकशी) केंद्रावर रांगेत उभे होतात. तेथे एवढा गोंगाट अन् गर्दी असते की नंबर आल्यानंतर समोरचा व्यक्ती काय सांगतो आहे, ते नीट लक्षातच येत नाही. शिवाय, माहिती अधिकाऱ्यालाही एवढी गडबड असल्याचे जाणवते की, तो झटपट माहिती देऊन माहिती विचारणाऱ्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या प्रवाशांचाही तगादा असतो. त्यामुळे अर्धवट माहिती घेऊन प्रवाशाला पाहिजे असलेली सुविधा शोधण्यासाठी इकडून तिकडे चकरा माराव्या लागतात. नंतर पुुन्हा पुन्हा दुसऱ्यांकडे विचारणा करावी लागते. प्रचंड मनस्ताप देणाऱ्या या प्रकारातून आता रेल्वे प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण मध्य रेल्वेने नागपूर विभागातील २५ प्रमुख रेल्वे स्थानकांवर डिजिटल नकाशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यातून प्रवाशांना प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या वेटिंग रूम (आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही), दिव्यांग (विशेष अपंग) तिकीट काउंटर, शौचालय, पाण्याचे नळ आणि कूलर, लिफ्ट, फूट ओव्हर ब्रिज, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग, आरपीएफ ठाणे (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स स्टेशन) आणि अन्य काही सुविधांबद्दल माहितीवजा मार्गदर्शन मिळणार आहे.

रात्रंदिवस २४ तास सेवा

ही सेवा दिवसाच नव्हे, तर २४ तास मिळणार आहे. रात्री देखील डिजिटल नकाशावरील स्थान स्पष्टपणे दिसावे यासाठी सेटअप बॅक-लाइट देण्यात आलेले आहे.

नागपूर, वर्धा, चंद्रपुरात मॅप कार्यान्वित

डिजिटल ॲक्सेस मॅप नागपूर विभागातील १७ स्थानकांवर सुरू करण्यात आला असून, त्यात नागपूर, वर्धा, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, वरोरा, हिंगणघाट, भांदक, काटोल, नरखेड, पुलगाव, धामणगाव, चांदूर, पांढुर्णा, मुलताई, आमला आणि बैतूल या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. अन्य ८ स्थानकांवर लवकरच ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे.
 

Web Title: digital map at 25 railway stations information about various facilities including waiting room available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.