नागपुरात डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिवल : शहर पोलिसांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 01:35 AM2020-05-16T01:35:33+5:302020-05-16T01:40:40+5:30
कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा आणि प्रभावी जनजागरण करता यावे, या संकल्पनेतून शहर पोलिसांनी डिजिटल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला आहे. स्पर्धेत निवडल्या गेलेल्या तीन उत्कृष्ट शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या कलावंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
संबंधितांनी एक ते दोन मिनिटाची डिजिटल शॉर्ट फिल्म बनवून ती पोलिसांकडे पाठवायची आहे. सोशल डिस्टन्स हा याचा विषय आहे.
अनेक गोष्टी वारंवार सांगूनही त्या लक्षात राहत नाहीत. याउलट एखादी चित्र अथवा व्हिडिओ बघून नागरिकांच्या मनावर त्याचा प्रभावी परिणाम होतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्स किती महत्त्वपूर्ण आहे, ते पटवून देण्यासाठी या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित कलावंत सोशल डिस्टन्स या विषयावर एक ते दोन मिनिटाची व्हिडीओ क्लिप बनवून ती 'एनजीपीपोलीसएसएफ@जीमेल डॉटकॉम' वर पाठवू शकतात. १६ ते २२ मे पर्यंत पाठविण्यात येणाऱ्या शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी विचारात घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी ती शॉर्ट फिल्म अथवा व्हिडीओ क्लिप कुठेही प्रदर्शित झालेली नसावी, ही स्पर्धेची मुख्य अट आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम तीन शॉर्ट फिल्म साठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि ११ हजार असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९२१७९४७९४ अथवा ९८२३२०७२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. २४ मे रोजी पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
दुहेरी उद्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनजागरण करण्यासोबतच नवनवीन कलावंताच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा उद्देशही या स्पर्धेमागे असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले आहे.