नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलीची आस लावून तसेच ५ सप्टेंबरकडे नजर लावून बसलेल्या राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या सेवास्थळ आणि नावावर एकमत न झाल्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ घेतली आहे.
पोलिस अधीक्षकांपासून अतिरिक्त पोलीस महासंचालकांपर्यंतच्या बदल्या राज्य सरकारने २ आणि ३ सप्टेंबरला केल्या. आता उर्वरित पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या पोलीस दलातील बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचा निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी ५ सप्टेंबर पर्यंतची मुदत होती. २ आणि ३ सप्टेंबरला करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे. 'आता आपली बारी' आहे, अशी भावना झालेले अनेक पोलीस अधिकारी बदलीची आस लावून बसले आहेत. अनेकांनी लॉबिंगही केले आहे. शुक्रवारी बदलीची यादी जाहीर होईल आणि त्या यादीत आपले नाव असेल, असा त्यातील अनेकांना अंदाज वजा विश्वास होता. मात्र बदलीची यादी घोषित होण्याऐवजी गृह विभागाच्या उपसचिवांचे पत्र आज जारी झाले. हे पत्र बदलीची आस लावून असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा हिरमोड करणारे ठरले. कारण यापूवीर्ची ५ सप्टेंबर पर्यंतच्या बदलीच्या निर्णयाची मुदत आता ३० सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. या संबंधाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे विचारणा करण्यासाठी लोकमत'ने वारंवार संपर्क साधला मात्र त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.क्रॉस कनेक्शन झालेया संबंधाने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अनेक जिल्हा स्थळी आपल्या मजीर्तील पोलीस अधीक्षक हवा असा आग्रह त्या त्या भागातील नेतेमंडळींनी धरला. परिणामी क्रॉस कनेक्शन झाले आणि अनेक जिल्हा स्थळी पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे मतभेद टाळण्यासाठी पुरेसा विचार विमर्श करून निर्णय घेण्याकरिता ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत वाढवून घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'ऑफ द रेकॉर्ड' सांगितले आहे.या प्रकारामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून ऐच्छिक ठिकाणी बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.तूर्त तयारी मोडावी लागणारविशेष म्हणजे, राज्यातील ठिकठिकाणांच्या पोलीस निरीक्षकांपासून तो अधीक्षक दर्जा पर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गाव, शहरात आपला सेवाकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे ५ सप्टेंबर पर्यंत आपली बदली होईल आणि आपण आपल्या गावाकडे जाऊ, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी सर्व तयारीसुद्धा करून ठेवली होती. मात्र आजच्या पत्रामुळे या सर्वांना काही दिवसांनसाठी तयारी मोडून आहे त्याच ठिकाणी कर्तव्य बजावणे अपरिहार्य झाले आहे.