कोरोना काळात आप्तांची चिंता;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:08 AM2021-04-21T04:08:10+5:302021-04-21T04:08:10+5:30
वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी! - भेटीगाठी नसल्याने अनेकांचे अश्रू अनावर -- वृद्धाश्रमातील एकूण सदस्य : ४६ स्त्री : २४ पुरुष ...
वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी!
- भेटीगाठी नसल्याने अनेकांचे अश्रू अनावर
--
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य : ४६
स्त्री : २४
पुरुष : २२
बाबा टेकाडे
सावनेर : लॉकडाऊननंतर हजारो किलोमीटर पायी चालत घरी जाणाऱ्या मजुरांच्या दोन वेळच्या जेवणासाठी मदत करणारे शेकडो हात पुढे आले. अनेकांनी मानवी संवेदना जपल्या! मात्र याच कोरोनामुळे नात्यातही दुरावा आणल्याचे प्रसंग आपण अनुभवले. आईला कोरोना झाल्यानंतर उपचारांनंतर तिला घरात घेण्यास नकार देणाऱ्या मुलगा-सुनेच्या कृतीमुळे समाजमन सुन्न झाले. अलीकडेच पुण्यात घडलेल्या या घटनेकडे समाजमाध्यमांनी जगाचे लक्ष वेधले. मात्र आजही आप्तांची आस बाळगणारे शेकडो आई-बाबा वृद्धाश्रमात एकाकी जीवन जगत आहेत. कोरोना काळात त्यांना घरच्यांची आठवणही येते. मात्र त्यांच्या घरच्यांना कधी पाझर फुटेल, हा प्रश्न आजही त्यांच्यापुढे आहे.
सध्या सावनेर तालुक्यातील (कळमेश्वर रोडवरील) स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमात एकूण ४६ वृद्धांनी आसरा घेतला आहे. यात २४ महिला आणि २२ पुरुषांचा समावेश आहे. यातील अनेकांच्या नातेवाइकांनी सध्या वृद्धाश्रमाकडे पाठ फिरविली आहे. एखाद्याची प्रकृती बिघडल्यास वृद्धाश्रमातील कर्मचारी संबंधितांच्या नातेवाइकांना फोन करतात. तरीही कुणीच येत नाही. मग कर्मचारीच आमची देखभाल करतात, असे काहींनी सांगितले.
कोरोना काळात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडांची आठवण येत असल्याचे काहींनी सांगितले. पण त्यांना आम्ही नकोसे असल्याने वृद्धाश्रमात ठेवण्यात आल्याची खंत काहींनी व्यक्त केली. आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करून रक्ताचे पाणी केले. मुलांना मोठे केले. शिकविले. मात्र वृद्धापकाळात त्यांचा आधार मिळाला नसल्याचे सांगत काहींचे अश्रू अनावर झाले.
भेट देणारे शून्यावर
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सुरक्षितेबाबत प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. याची अंमलबजावणीही वृद्धाश्रम प्रशासन करीत आहे. पूर्वी या वृद्धाश्रमाला महिन्याला सात ते आठ नातेवाईक भेट देत असत. लॉकडाऊन काळात ही संख्या नाहीच्या प्रमाणात होती. अॅनलॉकनंतर काहींचे नातेवाईक आले.
संस्कार शाळा घरात रुजली नाही
जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले एक आजोबा सध्या या वृद्धाश्रमात आहेत. शिक्षक म्हणून शेकडो विद्यार्थ्यांत संस्कार रुजविण्याचे कार्य करणाऱ्या या आजोबांना मुले संस्कारी निघाली नसल्याची खंत आहे. सहा मुले असलेल्या या आजोबांनी सर्वांचे लग्न थाटात केले. मोठे घरही बांधले. प्रत्येकाकडे गाडी-घोडा असल्याचे सांगत माझ्यासाठी कुणाकडे वेळ नसल्याचे सांगत त्यांचे अश्रू तरळले.
पतीनंतर आधार गेला
मुलांच्या लग्नानंतर सुखी संसार सुरू होता. अशात वृद्धापकाळाचा आधार असलेल्या पतीचे निधन झाले. सून क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी गेली. यानंतर वृद्धाश्रमात असल्याचे एका महिलेने सांगितले. प्रकृती बिघडल्यास नातू येतो. घरची आठवण येते. मात्र उपाय नाही. कसेतरी दिवस काढत असल्याचे एका आजीने सांगितले.
आधार हरवलेले जीवन
मुलींची लग्ने झाल्यानंतर कुणाचाही आधार मिळाला नाही. थकत्या वयामुळे धुण्याभांड्याची कामेही जमत नव्हती. भाड्याच्या घरात किती दिवस राहायचे म्हणून शेवटी वृद्धाश्रमाचा आधार घेतला. मुलींची आठवण येते. एका मुलीचा महिन्या दोन महिन्यातून चौकशीसाठी फोन येतो. कोरोना काळात जग बंदिस्त झाल्याची खंत या आजीने व्यक्त केली.