एमपीएससीच्या व्यवस्थापनावर आक्षेप : वेळेत परीक्षा घेण्याची मागणी
नागपूर : एमपीएससीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने खुल्या गटासाठी ६, ओबीसीसाठी ९ संधी ठरवून दिल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला आणि तो अर्ज आयोगाला मिळाला किंवा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी समजली जाईल. संधीचे बंधन लावल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार असून संधीची अट काढून टाकावी, अशा प्रतिक्रिया एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. परंतु यूपीएससीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत एका वर्षात पार पडते. परंतु एमपीएससीच्या परीक्षा वेळेत होत नाहीत. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी दीड वर्ष लागते. एखाद्या वेळी परीक्षा पुढे ढकलल्यास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. निवड झालेल्या उमेदवारांना दीड वर्षापर्यंत नेमणूक देण्यात येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नेमणूक न दिल्यामुळे त्यांना आंदोलन करण्याची गरज भासते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षा यूपीएससी प्रमाणे वर्षभरात पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
..............
अशी होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
आधीच्या संधी ग्राह्य धरणे चुकीचे
‘एमपीएससीच्या परीक्षेसाठी संधी ठरवून देण्याचा निर्णय चांगला आहे. यामुळे विद्यार्थी अधिक मेहनत करून परीक्षेची तयारी करतील. परंतु विद्यार्थ्याने आधीचे केलेले प्रयत्न मोजणे चुकीचे आहे. नियम लावल्यापासून संधी मोजण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.’
-उमा देशमुख, एमपीएससी परीक्षार्थी
गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार
‘संधीमुळे पार्टटाईम जॉब करून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यांना मोजक्याच संधीत तयारी करावी लागेल. आधी भरपूर संधी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव राहत नव्हता. परंतु आता जशजशा संधी कमी होतील तसा त्यांच्यावर दबाव वाढणार आहे. याशिवाय सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि पेपरला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास ती संधी समजू नये.’
-शुभांगी इंजेवार, एमपीएससी परीक्षार्थी
संधीची अट काढून टाकावी
‘पूर्वी एमपीएससीच्या परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची संधी होती. परंतु आता मोजक्याच संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव वाढणार आहे. संधी कमी होतील तसी विद्यार्थ्यांना धडकी भरणार आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांमध्ये निराशा वाढीस लागणार असल्यामुळे एमपीएससीसाठी संधीची अट काढून टाकणे आवश्यक आहे.’
-अक्षय वरघणे, एमपीएससी परीक्षार्थी
संधीची अट चुकीची
‘एमपीएससी दरवर्षी परीक्षा घेत नाही. त्यामुळे संधी असूनही अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाते. शिवाय संधी असल्यास विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत तरी त्यापासून अनुभव घेऊन पुढील परीक्षेत चांगली तयारी करतील. त्यामुळे संधीची अट चुकीची आहे. एमपीएससीने ही अट रद्द करावी.’
-नीतेश गेडाम, एमपीएससी परीक्षार्थी
............