दिवाळी भेट : शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:36 PM2018-11-05T23:36:03+5:302018-11-05T23:37:07+5:30
राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महावितरणतर्फे कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच काँग्रेसनगर विभागातील खामला आणि बुटीबोरी विभागातील जामठा येथील ३३/११ केव्हीए उपकेंद्राचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, खा. कृपाल तुमाने, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, नारायण आमझरे उपस्थित होते.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील चार उपकेंद्रांचे लोकार्पण करून जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण केले आहे. तरोडी आणि वदोडा उपकेंद्राची उभारणी विहित मुदतीदरम्यान केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.
काँग्रेसनगर विभागासाठी १०० कोटी
महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाचा विभाग बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी या विभागातील विकास कामासाठी १०० कोटींचा विशेष निधी मंजूर केला असून त्यात रस्त्यावरील वीज खांब हटविणे, वाहिन्या भूमिगत करणे, घरावरील वीज वाहिन्या काढणे आदी कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बुटीबोरी जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात आणि नागपूर शहरातील खामला उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी केल्या. नागपूर शहराच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक हजार कोटींची विविध विकास कामे सुरू असून त्यात महावितरणसाठी १०६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या परिसराला मिळणार लाभ
तरोडी येथील वीज उपकेंद्रातून अडका, परसोडी, बिडगाव परिसरातील २६०० ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे. तर वडोदा येथील वीज उपकेंद्रातून वडोदा, गुमथळा, पारडी परिसरातील २६०० वीज ग्राहकांना सहा वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होईल. यातून एकूण आठ वाहिन्या काढण्यात आल्या असून त्यावरून १७०० घरगुती, ९०० कृषी आणि १४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळेल. तसेच खामला उपकेंद्रातून आठ वाहिन्यांद्वारे टेलिकॉमनगर, दीनदयालनगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालस शाळा, भेंडे ले-आऊट, खामला, पांडे ले-आऊट, चिंचभवन येथील १६,५०० वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होईल.