राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका : जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:02 PM2019-08-06T21:02:09+5:302019-08-06T21:05:17+5:30
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
राष्ट्रीय सणांच्या व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांकडून अनेकदा अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. हे टाळण्याकरिता उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचे निर्णय दिले आहेत. सोबतच कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्याकरिता जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्याचे निर्देश आहेत, असे मुद्गल यांनी सांगितले. रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. तसेच जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावेत, असे आवाहनदेखील त्यांनी केले.