जनावरे पाळण्याचा तुमच्याकडे परवाना आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:25 AM2020-02-17T10:25:50+5:302020-02-17T10:27:23+5:30
नागरी वस्तीत जनावरे पाळण्याचा परवाना असावा लागतो. तसा कायदाच आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नाही. बहुतांश जण विनापरवानाच जनावरे पाळतात अन् त्यांची योग्य देखभालही करत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुमच्याकडे जनावरे पाळण्याचा परवाना नाही? मग तुमच्यावर कारवाई होऊ शकते. खरे वाटत नसेल तर चौकशी करा. १३ फेब्रुवारीला मानकापूर पोलिसांनी विना परवाना जनावरे पाळणाऱ्या एका जणावर गुन्हा दाखल केला. हेमंत रामभाऊ आरेकर (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे.
अनेक जण जनावरे पाळतात. मात्र, ते त्यांची व्यवस्थित देखभाल करीत नाही. दूध काढले की त्यांना मोकाट सोडून दिले जाते. ही मोकाट गुरे शहरात चक्क रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडसर निर्माण होतो. ते ठिकठिकाणी घाण करून ठेवतात. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागते अन् आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन लोकमतने काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. त्यावेळी पोलिसांनी महापालिका प्रशासनाच्या मदतीने मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याची विशेष मोहीम राबविली होती. त्यामुळे काही दिवस मोकाट गुरे रस्त्यावर येण्याचे प्रकार थांबले. मात्र आता परत ते जैसे थे झाले आहे. विशेष म्हणजे, नागरी वस्तीत जनावरे पाळण्याचा परवाना असावा लागतो. तसा कायदाच आहे. मात्र, त्याकडे कुणी लक्ष देत नाही. बहुतांश जण विनापरवानाच जनावरे पाळतात अन् त्यांची योग्य देखभालही करत नाही. असेच मानकापुरातील श्रीनगरात राहणारे हेमंत आरेकर कोणताही परवाना न घेता २० गाई म्हशी पाळत असल्याचे पोलिसांनी हेरले. त्यामुळे त्यांना प्रारंभी पोलिसांनी सूचना केली. त्यांनी दाद न दिल्यामुळे मानकापूर ठाण्यात आरेकर यांच्याविरुद्ध १३ फेब्रुवारीला सायंकाळी विना परवाना जनावर पाळण्याच्या आरोपाखाली कलम ३, १३ नुसार गुन्हा दाखल केला.
इतरांनी खबरदारी घ्यावी ।
हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी इतरांनाही सूचना केली आहे. विना परवाना नागरी वस्तीमध्ये जनावरे पाळून, त्यांची योग्य देखभाल न करणाऱ्यांनी या कारवाईपासून समज घ्यावी, अन्यथा त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असे मानकापूर पोलिसांनी कळविले आहे.