कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गुळवेल नियमित घेताय? मग 'हे' आधी वाचा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:12 PM2021-08-23T12:12:56+5:302021-08-23T12:13:43+5:30
Nagpur News रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आलेले गिलोय (गुळवेल) औषध यकृतासाठी हानिकारक ठरल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुर्वेदिक औषधींमुळे शरीराला काही नुकसान पोहोचत नाही, अशी जुनी मान्यता राहिली आहे. मात्र, कोरोना काळात वापरण्यात आलेल्या अनेक औषधांच्या विपरीत परिणामांमुळे ही मान्यता फोल ठरली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आलेले गिलोय (गुळवेल) औषध यकृतासाठी हानिकारक ठरल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
शहरातील गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार आणि डॉ. सौरभ मुकेवार यांनी सांगितले की, डिसेंबर २०२० ते जून २०२१ यादरम्यान पाच रुग्ण असे आढळून आले, ज्यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचे सेवन केले व नंतर त्यांना कावीळची लागण झाली व गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करावे लागले. डॉ. मुकेवार यांनी सांगितले की, गुळवेल सेवनाने काविळ झालेल्या या पाचही रुग्णांना मिडास मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची पार्श्वभूमी तपासली असता कावीळसाठी कारणीभूत ठरणारे कोणतेही लक्षण त्यांना आढळून आले नाही. या पाचपैकी दोन रुग्ण असे होते ज्यांनी वर्षभरात दोनदा गुळवेलचे सेवन केले व दोन्ही वेळा त्यांना कावीळची लागण झाली होती. उर्वरित तिघांच्या लिव्हरची तपासणी केली असता औषधांमुळेच लिव्हरला नुकसान पोहोचल्याचा निष्कर्ष समोर आला. मधुमेह किंवा थॉयराईड असलेल्या रुग्णांना अशाप्रकारे लिव्हरला नुकसान होण्याचा धोकाही अधिक असतो.
गुळवेलला संस्कृतमध्ये गुडूची म्हटले जाते व त्याचे वैज्ञानिक नाव 'टिनोस्पोरा कार्डिफोलिया' असे आहे. या वनस्पतीची पाने, शाखा व मुळांच्या तुकड्यांना पाण्यात उकडून काढा तयार करून पिण्यात येते किंवा त्यांना वाळवून भुकटी तयार करून सेवन केले जाते.