डॉक्टर घरी, रुग्ण वाऱ्यावर

By admin | Published: May 9, 2017 01:40 AM2017-05-09T01:40:51+5:302017-05-09T01:40:51+5:30

दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही.

Doctor at home, patient wind | डॉक्टर घरी, रुग्ण वाऱ्यावर

डॉक्टर घरी, रुग्ण वाऱ्यावर

Next

कामगार रुग्णालय आजारी : वेळेत येण्याच्या नियमालाच ठेंगा
सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीड लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही. बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ९ वाजताची असताना वरिष्ठ डॉक्टर १० वाजता पूर्वी येत नाही. काही तर ११ वाजेपर्यंत येतात. रुग्ण मात्र लवकर नंबर लागून उपचार मिळतील या आशेवर सकाळी ७.३० वाजेपासून रांगेत लागलेले असतात. विशेष म्हणजे, कर्मचारी, तंत्रज्ञ यांनाही उशिरा येण्याची सवय लागल्याने अख्खे रुग्णालय वाऱ्यावर पडले आहे.
‘लोकमत’ चमूने सोमवारी सकाळी ९ वाजता या रुग्णालयाची पाहणी करीत बाह्यरुग्ण विभागात ‘स्टींग आॅपरेशन’ केले, असता नोंदणी कक्षाची वेळ सकाळी ८.३० वाजताची असताना तब्बल ९.४५ वाजता सुरू झाले. सकाळी १० वाजेपर्यंत डॉक्टरांचे सर्वच कक्ष रिकामे होते. त्यानंतर एक-एक डॉक्टर यायला सुरुवात झाली. कान, नाक, घसा विभागात तर १०.४५ वाजेपर्यंत डॉक्टरांचे आगमन झालेले नव्हते. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षकांपासून सर्वांनाच याची माहिती आहे. परंतु वर्षानुवर्षे उशिरा येण्याची परंपरा सुरू असल्याने जणू काही सर्वांना याची सवय लागल्याचे आढळून आले.
सव्वा तासानंतर उघडला नोंदणी कक्ष
विमा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या नोंदणी कक्षाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० वाजताची आहे. कामगार व त्यांचे नातेवाईक त्या दिवसाची रोजी पडू नये किंवा अर्ध्या दिवसांची तरी रोजी मिळावी म्हणून सकाळी ७.३० वाजतापासून रांगेत लागले होते. सकाळी ९ वाजता ‘लोकमत’ची चमू या कक्षात पोहचल्यावर कक्षातील नोंदणी खिडकी बंद होती. रांगेत पहिल्या क्रमांकावर असलेले हृदयविकाराचे रुग्ण अधिरकुमार गजभिये हे बुटीबोरीवरून उपचारासाठी आले होते. ते सकाळी ७ वाजेपासून रांगेत होते. यावेळी १०० रुग्ण लवकर नोंदणी करून तातडीने उपचार होतील, या आशेने रांगेत उभे होते. तब्बल सव्वा तास उशिराने, ९ वाजून ४५ मिनिटांनी ही खिडकी सुरू झाली. यातच एकच महिला कर्मचारी रुग्णाची नोंदणी करीत असल्याने रुग्ण ताटकळत उभे होते.
डॉक्टर राऊंडला गेले आहेत...
रुग्णालयाच्या ओपीडीच्या प्रत्येक विभागाला ‘लोकमत’चमूने भेट दिली असता डॉक्टर हजर नव्हते. मात्र, उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संख्येत प्रत्येक मिनिटाला वाढच होत होती. डॉक्टरांच्या कक्षाबाहेर बसलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता, पहिल्यांदा आले आहेत का, तुम्हाला माहीत नाही का, डॉक्टर एवढ्या लवकर येत नाही. ते राऊंडला गेले आहेत’ असे रागवून सांगत, रांगेत उभे रहायला सांगत होते.
सफाई कर्मचारीच काढतात रुग्णांचे रक्त
विमा रुग्णालयात डॉक्टरच नव्हे तर अटेन्डंट व तंत्रज्ञांच्याही जागा रिक्त असल्याने सफाई कर्मचारी रुग्णांचे रक्त काढून ते तपासणीसाठी पाठवितात. यात रुग्णाच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण हा प्रश्न आहे. रक्त तपासणी विभागात ‘लोकमत’चमू गेली असता निखिल नावाचा सफाई कर्मचारी रुग्णाचे रक्त काढत असल्याचे दिसून आले.
ईएनटी विभाग बेभरवशावर
कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाच्या कक्षात १० वाजून ४५ मिनिटे झाली असतानाही संबंधित डॉक्टर पोहचले नव्हते. येथे रुग्णांची लांबचलांब रांग लागलेली होती. यात वयोवृद्ध रुग्णांची संख्या जास्त होती. येथील रुग्णांना डॉक्टर कधी येतील असा प्रश्न केल्यावर त्यांनी ११ वाजताच्या नंतरच येतात, असे उत्तर दिले.
ओपीडीत १० वाजले तरी डॉक्टर गैरहजर
बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) डॉक्टरांची येण्याची वेळ सकाळी ९ वाजताची आहे. आज सोमवार असल्याने औषध वैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन), शल्यक्रिया विभाग (सर्जरी), बालरोग विभाग, मनोचिकित्सा विभाग व ईएनटी विभागाची ओपीडी होती. परंतु १० वाजेलेतरी डॉक्टर जागेवर नव्हते. रुग्णालयाच्या अस्थिरोग, सर्जरी, छातीरोग विभागाचा वॉर्डाचा दिवस असताना तिथेही संबंधित डॉक्टर पोहचले नव्हते. तर बालरोग विभागाच्या किंवा नेत्ररोग विभागाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झालेली नव्हती. रुग्णालयात केवळ पॅथालॉजिस्ट डॉ. मीनल खरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना चौधरी हे आपल्या कामात व्यस्त असताना दिसून आले.

Web Title: Doctor at home, patient wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.