घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस काढून वसीम ती ऑटोत भरत होता. पाण्याच्या मोटारचा वापर करून तो गॅस ट्रान्सफर करीत होता. त्यासाठी मोटारच्या एका बाजूचा पाइप एलपीजी सिलिंडरला जोडायचा आणि दुसरा ऑटोच्या टँकमध्ये सोडायचा. त्याची ही शक्कल पाहून कारवाई करणारे पोलीसही काही वेळेसाठी चक्रावले. थोडीशीही चूक झाल्यास या प्रकारामुळे स्फोट अथवा आगीसारखा भयंकर प्रकार घडू शकतो, याची कल्पना असूनही वसीम हा अत्यंत धोकादायक गैरप्रकार करीत होता. पोलिसांना पाहून तो पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून गॅस सिलिंडर आणि ट्रान्सफरचे साहित्य जप्त केले. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगरचे ठाणेदार जी. जे. जामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
----