दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन आणि शार्प शूटरलाही देणार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:08+5:302021-04-08T04:09:08+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ठिकठिकाणच्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन, मुंबई, गोव्यासह ठिकठिकाणचे शार्पशूटर आणि गंभीर आरोपांत ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठिकठिकाणच्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन, मुंबई, गोव्यासह ठिकठिकाणचे शार्पशूटर आणि गंभीर आरोपांत बंदिस्त असलेल्या विदेशी गुन्हेगारांसह सुमारे २२०० कैद्यांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात वॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे.
गुरुवारी सकाळपासून त्यासाठी लसीकरण सुरू होणार आहे.
शासन आणि प्रशासनाने पुण्याच्या येरवडा आणि मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहासह नागपुरातील मध्यवर्ती कारागृहालाही लस उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची वसाहत तसेच सुधार आणि पुनर्वसन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट घडवून आणणारे इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी भटकळ बंधू तसेच मुंबईच्या बॉम्बस्फोट मालिकेतील आणि पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील सिद्ध दोष दहशतवादी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. येथेच मुंबई अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि विविध टोळ्यांमधील गुंड तसेच अमली पदार्थांची तस्करी करणारे देश-विदेशांतील गुन्हेगार आणि शार्पशूटरही नागपूरच्या कारागृहात बंदिस्त आहेत. यांच्यातील अरुण गवळीसह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. कैद्यांनाच नव्हे तर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांसह २२ अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
विशेष म्हणजे, कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी औषधोपचाराची विशिष्ट पद्धत कारागृहात राबविल्यामुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र, दररोज नवीन कैद्यांची कारागृहात भर पडत असल्याने कोरोनाचा धोका रोजच वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर, कारागृहातील सर्वच्या सर्वच कैद्यांचे लसीकरण व्हावे यासाठी शासन प्रशासन स्तरावर नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. त्याला यश आले असून मध्यवर्ती कारागृहासाठी प्रशासनाने मुबलक लस साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी १० वाजता मध्यवर्ती कारागृह परिसरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
-
कारागृह इस्पितळातील वैद्यकीय पथक सज्ज
गुरुवार सकाळी सुरू होणाऱ्या कैद्यांच्या लसीकरणासाठी मध्यवर्ती कारागृहातील तीन डॉक्टर, तीन वैद्यकीय कर्मचारी आणि महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या दोन परिचारिका कैद्यांना लस देणार आहेत.
प्रारंभी ४५ वर्षाच्यावरील कैद्यांना लस दिली जाईल आणि त्यानंतर उर्वरित वयोगटांतील सर्वच्या सर्व कैद्यांना लस दिली जाणार
असल्याचे कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
--
१८ ते ८५ चा वयोगट
कारागृहात बंदिस्त कैद्यांमध्ये १८ वर्षांपासून ८५ वर्षापर्यंतच्या कैद्यांचा समावेश आहे. त्यात ४० टक्के सिद्धदोष (शिक्षा सुनावलेले) गुन्हेगार असून ६० टक्के कैदी न्यायप्रविष्ट (अंडरट्रायल) आहेत
---