बंदोबस्ताचे दुहेरी दडपण : राष्ट्रपतींचा दौरा अन् विधी सेवा प्राधिकरणाचे संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:59 AM2019-08-18T00:59:59+5:302019-08-18T01:01:02+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या संमेलनात सरन्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांचे आगमन होणार असल्याने शहर पोलीस दलावर बंदोबस्ताचे दुहेरी दडपण होते. मात्र, हे दोन्ही बंदोबस्त चोखपणे पार पडल्याने शहर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनीही सुटकेचा निश्वास टाकला.
भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने वर्धा येथे गेले आणि तेथून दुपारी पुन्हा विमानतळावर आले. विमानतळ ते राजभवन आणि काही तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा विमानतळ असा प्रवास ते मोटारीने करणार होते. त्यामुळे हा मार्ग (रस्ता) दोहोबाजुने सिल करण्यात आला होता. या मार्गावर बंदोबस्तासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. विमानतळावर आणि राजभवनाच्या सभोवतालही कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यासाठी शहर पोलीस दलातील चार पोलीस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, ५४ उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक, ४७३ पुरुष तर ६३ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय एसआरपीएफ, आरसीपी आणि क्यूआरटीही मदतीला बोलवून घेण्यात आली होती. विमानतळ ते राजभवनपर्यंतच्या मार्गावर वॉचर आणि गुप्तचरही पेरण्यात आले होते. जागोजागी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करवून घेण्यात आली होती.
ऐनवेळी आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणेकडून सेफ झोन तयार करण्यात आले होते.
राष्ट्रपतींच्या या बंदोबस्तासोबतच पोलिसांवर आणखी एका बंदोबस्ताची जबाबदारी होती. राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अखिल भारतीय संमेलन शनिवारी नागपुरात आयोजित करण्यात आले होते. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधीश या संमेलनात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मुंबईवरून आलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी रात्रीपर्यंत बैठका घेतल्या. सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून त्याप्रमाणे दोन्ही बंदोबस्ताची उत्तमरीत्या जबाबदारी पार पाडण्यात आली. राष्ट्रपतींचा दौरा अन् विधी सेवा प्राधिकरणाचे संमेलन चांगल्या पद्धतीने पार पडल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला.