डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाला भग्नावस्था ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:41+5:302021-04-14T04:07:41+5:30
नागपूर : अंबाझरी तलाव आणि उद्यानाजवळील ज्या ठिकाणी १९७६ पासून आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा जल्लाेष साजरा केला, त्या डाॅ. बाबासाहेब ...
नागपूर : अंबाझरी तलाव आणि उद्यानाजवळील ज्या ठिकाणी १९७६ पासून आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा जल्लाेष साजरा केला, त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा श्वासच काेंडायला लागला आहे. महामानवाच्या नावाचा वारसा जपणाऱ्या या भवनाची अक्षरश: भग्नावस्था झाली आहे. याचा फायदा घेत रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने भवनाचा गाेदामासारखा वापर करून आंबेडकरी विचारांची मुस्कटदाबी चालविली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाण ठेवून नागपूर महापालिकेने १९७६ साली अंबाझरी उद्यानाजवळ १८.८६ एकर परिसरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली हाेती. तेव्हापासून हे भवन आंबेडकरी चळवळीचे, बाैद्ध परिषदा, सभा, संमेलनाचे केंद्र ठरले हाेते. तलावाजवळच्या शांत, निसर्ग रमणीय परिसरातील हे भवन अनेक वर्षे लाेकाेपयाेगी कार्याने उत्साहित असायचा. मात्र, साल २००० नंतर जणू या भवनाला अवकळा आली. मनपा प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे भवनाची दुरवस्था झाली आणि हे भवन आज एखाद्या भग्न इमारतीप्रमाणे उभे आहे. काही वर्षांपूर्वी भवनाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने बजेटमध्ये ५० लक्ष रुपये निर्धारित केले हाेते. मात्र, पुढे काय झाले पत्ता नाही. या भवनाचा कायापालट करून लाेकाेपयाेगी कार्यासाठी खुले करण्याचे आश्वासन मागे महापाैरांनी दिले हाेते; पण त्यानंतर काही झाले नाही. परिस्थिती आता अशी झाली की अंबाझरी ते अमरावती राेड या रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने या भवनाचा गाेदामासारखा वापर करून बांधकाम साहित्य येथे ठेवणे चालविले आहे. मात्र, त्याकडेही गांभीर्याने लक्ष घातले गेले नाही. एवढेच नाही तर माेकाट कुत्रे, जनावरांचा हैदाेस येथे चाललेला असताे.
बौद्ध आंबेडकरी रिपब्लिकन विचारधारेच्या समाजधुरिणांच्या प्रयत्नाने, प्रबोधनाने व सामाजिक कला व सांस्कृतिक विचारधारेच्या पदस्पर्शाने साकारलेल्या या वास्तूचे नूतनीकरण करून हे ऐतिहासिक व अविस्मरनीय स्थळ विकसित करावे, अशी मागणी समता सैनिक दल, दी बुद्धिष्ट सोसायटी आफ इंडिया, सहयोग मित्र परिवार, सामाजिक संघटन रिपब्लिकन मूव्हमेंट, स्त्रीभूषण रमाई आबेडकर संस्था, नागपूर शहर विकास मंच, परिवर्तन विचार मंच आदी संघटनांनी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त केली आहे.