लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून १०० मीटर अंतरावर, उड्डाणपुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक सोडून पळ काढणारा आरोपी ट्रकचालक धर्मेंद्र कृष्णपाल (वय ४२) याला अखेर प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या निष्काळजीपणामुळे शहर पोलीस आणि विविध तपास यंत्रणांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत प्रचंड खळबळ उडाली होती. ट्रक तेथून दुसरीकडे हलविल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नागपूर-वर्धा मार्गावरच्या उड्डाणपुलावर एक ट्रक बराच वेळेपासून उभा असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी प्रतापनगर पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी तेथे सहकाऱ्यांसह जाऊन बघितले असताना ट्रक बंद अन् चालक गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रकमधील कागदपत्रे तपासल्यानंतर त्यातील एका मोबाईल नंबरवर संपर्क केला. त्यानंतर या ट्रकमध्ये स्फोटके असल्याची माहिती त्यांना मिळाली. ज्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेला ट्रक (छत्रपती चाैकाजवळ उड्डाणपुलावर) होता ते ठिकाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून अवघे १०० मीटर अंतरावर असल्याने पोलीसच नव्हे तर सर्वच तपास यंत्रणा हबकल्या. अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. कसेही करून चालकाला शोधा आणि ट्रक तेथून हलवा, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, ट्रकमालकाने दिलेल्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क केला. मात्र ट्रकचालकाने डिझेल संपल्याने ट्रक तेथे सोडल्याचे सांगून स्वत:चा मोबाईलच बंद करून टाकला. त्यामुळे पोलिसांची धडधड वाढली. तेथे पोहचलेल्या वरिष्ठांसह दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच अन्य तपास यंत्रणांचीही धावपळ वाढली. पोलिसांनी डिझेल आणून भरले मात्र एअरमुळे पंपमध्ये बिघाड झाल्याने ट्रक सुरूच होईना. त्यामुळे पोलिसांनी अनेक मेकॅनिक तेथे आणले. त्यांनी मध्यरात्री तो ट्रक सुरू केला अन
स्फोटकांनी भरलेला ट्रक तेथून सोनेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तेथे सुरक्षेचे अन्य उपाय केल्यानंतर पोलीस, बीडीडीएस आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मोबाईल सुरू, आरोपी ठाण्यात
आपला मोबाईल बंद करून पोलिसांची धडधड वाढवणारा आरोपी ट्रकचालक धर्मेंद्र याने अखेर त्याचा मोबाईल सुरू केला. त्याच वेळी पोलिसांनी त्याच्याशी संपर्क करून तू ये आणि ट्रक घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार, सकाळी धर्मेंद्र पोलिसांकडे आला आणि प्रतापनगर पोलिसांनी त्याला अटक केली.