नागपूर - वारंवार सूचना अन् पत्र पाठवूनही वाहनचालक ई चालान भरण्यास तयार नसल्याने पोलिसांनी आता अशा वाहनचालकांची केस लोक अदालतीत ठेवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी २६४१२ वाहनचालकांना नोटीस पाठविलेली आहे.
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६४१२ वाहनचालकांविरुद्ध वर्षभरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली. या सर्वांना वारंवार सूचना करूनही त्यांनी सरकारी कोषागारात ई चालानची थकित रक्कम जमा केलेली नाही. या वाहनधारकांकडे पोलिसांचे ई चालानच्या रुपातील ३ कोटी ६८ लाख रुपये थकित आहे. अशांना पोलिसांनी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून १ मार्च ते २१ ऑगस्टपर्यंत नोटीस पाठविलेली आहे. वाहनधारकाच्या मोबाईलवर मेसेजच्या रुपातही ही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांना त्यांच्याकडे थकित असलेली ई चालानची रक्कम २१ सप्टेंबरपर्यंत जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. नमूद मुदतीपर्यंत ही रक्कम जमा केली नाही तर संबंधित वाहनचालकांना २५ सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तेथे वाहनधारकाने समाधानकारक बाजू मांडली नाही तर दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी पोलिसांकडून संबंधितांचे वाहन जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. आरोप, वाद टाळण्यासाठीवाहतूकीचे नियम मोडणाऱ्यासोबत वाहतूक शाखेच्या पोलिसांचे नेहमी वाद व्हायचे. नंतर आरोप प्रत्यारोपही व्हायचा. अनेकदा पोलिसांवर वाहनचालकांकडून गंभीर स्वरूपाचे आरोप केले जायचे. व्हिडीओही व्हायरल केले जायचे. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ई चालानच्या कारवाईवर भर देण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात पोलिसांशी वाद घालण्याच्या, मारहाणीच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत, हे विशेष।