राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवठादारांचा पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:39 AM2017-12-09T09:39:18+5:302017-12-09T09:44:17+5:30
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कान्ट्रॅक्ट) संपून चार महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील औषध पुरवठादारांचे वर्ष होऊनही सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी, राज्यभरातील मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
सुमेध वाघमारे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कान्ट्रॅक्ट) संपून चार महिन्यांवर कालावधी झाला आहे, तर दुसरीकडे राज्यभरातील औषध पुरवठादारांचे वर्ष होऊनही सुमारे ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी ५ डिसेंबरपर्यंत न मिळाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचे पत्र राज्यभरातील पुरवठादारांनी एकत्र येऊन वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) दिले आहे. परंतु ‘डीएमईआर’ तातडीने काहीच करायला तयार नसल्याने पुरवठादाराने पुरवठा बंद केला आहे. परिणामी, राज्यभरातील मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्ण अडचणीत सापडले आहेत.
आशेचाकिरण म्हणून ज्या मेडिकलकडे पाहिले जाते त्याच मेडिकलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून औषधांचा ठणठणाट आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या पाचमधून केवळ एक किंवा दोन अनेकवेळा तीही औषधे रुग्णांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अतिदक्षता व आकस्मिक विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून कमी आणि बाहेरूनच जास्तीतजास्त औषधे आणण्यास पिटाळून लावले जात आहे. असे भीषण चित्र असताना वैद्यकीय शिक्षण विभागाचे ‘आरसी’ ४ आॅगस्टला संपूनही अद्यापही मुदतवाढ किंवा नूतनीकरण केले नाही. विशेष म्हणजे, बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले. ‘लोकमत’नेही महिन्याभरापूर्वी ‘राज्यातील मेडिकल ‘गोरखपूर’च्या मार्गावर या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी ‘आरसी’ला मुदतवाढ देण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सचिवांनी तत्काळ मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले होते. परंतु दीड महिन्यावर कालावधी होत असताना ‘आरसी’ची मुदतवाढ किंवा नूतनीकरण झाले नाही. यामुळे सर्वच मेडिकल आता अडचणीत आले आहेत. नागपूरच्या दोन्ही रुग्णालयात तर ३० डिसेंबरपर्यंत औषधांचा साठा असल्याचे बोलले जात आहे.
२७ नोव्हेंबर रोजी दिले होते पत्र
शासनाने १५ आॅगस्ट २०१७ पासून औषधे खरेदीची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविली. तसे अद्यादेशही काढले. परंतु या कंपनीकडून अद्यापही औषधे खरेदी झालेली नाही. दुसरीकडे या निर्णयाने औषधांची देयके मंजूर होणार नाही या विचारातून पुरवठादाराने २७ नोव्हेंबर रोजी ‘डीएमईआर’ला पत्र देऊन ५ डिसेंबरपर्यंत थकबाकी देण्याची विनंती केली, अन्यथा पुरवठा थांबविण्याचा इशाराही दिला. परंतु थकबाकीच्या संदर्भात ठोस भूमिका कोणीच घेत नसल्याने पुरवठा ठप्प केल्याचे पुरवठादारांचे म्हणणे आहे.
सहानुभूतीचा औषध पुरवठाही बंद करणार
एका औषध पुरवठादाराने सांगितले, एकीकडे ‘आरसी’ संपली आहे तर दुसरीकडे ३५ कोटींची थकबाकी आहे. या स्थितीतही काही पुरवठादार गरीब रुग्णांचा विचार करून सहानभूती म्हणून काही औषध पुरवठा करीत आहे. परंतु ‘डीएमईआर’ आमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल तर तेही बंद करू, असे रोखठोक मत मांडले.
‘आरसी’ मुदतवाढीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे
‘डीएमईआर’ आरसी मुदतवाढीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांनी याबाबत काही पूरक माहिती मागितली आहे. यामुळे साधारण येत्या सोमवार किंवा मंगळवारी ‘आरसी’ला मुदतवाढ मिळू शकेल. पुरवठादारांचे औषध पुरवठा बंद करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु त्यांना हिवाळी अधिवेशनापर्यंत पुरवठा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. त्यांच्या थकबाकीचा निपटाराही लवकरच केला जाईल.
-डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग