नागपुरात मद्यधुंद पोलीसपुत्राने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:35 AM2018-02-13T00:35:51+5:302018-02-13T00:37:22+5:30
मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने भरधाव कार चालवून दुचाकीवरील एका तरुणाचा बळी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने भरधाव कार चालवून दुचाकीवरील एका तरुणाचा बळी घेतला.
श्रीराम पुंजराम डोंगरे (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव असून, तो वर्धा जिल्ह्यातील सेलू-लवणे (ता. कारंजा घाडगे) येथील रहिवासी होता.
नागपुरात एका कंपनीत काम करणारा श्रीराम त्याच्या दुचाकीने नागपूरहून रविवारी मध्यरात्री काटोल मार्गाने जात होता. ओली पार्टी करून आलेल्या एमएच ३१/ ईडब्ल्यू ०५५३ च्या इंडिका चालकाने वेगात कार चालवून डोंगरेच्या दुचाकीला धडक मारली. काटोल मार्गावरील जंगल सफारीच्या दाराजवळ मध्यरात्री हा अपघात घडला. जखमी डोंगरेला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा करुण अंत झाला. अपघाताची माहिती कळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चौकशीत ही कार एका पोलीस कर्मचाºयाची असल्याचे स्पष्ट झाले. तो पोलीस मुख्यालयात कार्यरत असून, त्याच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने श्रीराम डोंगरेला धडक मारल्याचेही स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालविण्यास दिल्याच्या आरोपावरून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला.