पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ‘डीटीई’ राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 09:10 PM2018-07-05T21:10:36+5:302018-07-05T21:11:59+5:30
दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणातून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ‘डीटीई’च (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविणार आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाच्या माध्यमातून माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणातून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ‘डीटीई’च (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविणार आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाच्या माध्यमातून माहिती दिली.
दहावी उत्तीर्ण झालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने त्यांना ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत विद्यार्थ्यांकडूनदेखील अनेक तक्रारी आल्या. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाºया पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया महाराष्ट्र विनाअनुदानित व्यावसायिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ याद्वारे स्थापन केलेल्या प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सद्यस्थितीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्या माध्यमातून पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश होतात. यापुढे हे प्रवेश ‘डीटीई’च्या माध्यमातूनच होतील. यासंबंधात गुरुवारी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
शिष्यवृत्तीचा लाभ कायम राहणार
विविध व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळत असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनांचे लाभ कायम राहतील. यासाठी स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, असे विनोद तावडे यांनी सभागृहाला सांगितले.
तीन पदविका अभ्यासक्रम वगळले
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अंतर्गत येणारे ‘अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका’, ‘औषधीनिर्माणशास्त्र पदविका’ व ‘हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान पदविका’ हे तीन अभ्यासक्रम या कक्षेतून वगळले आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया यापुढे ‘डीटीई‘च्या माध्यमातून होईल. सद्यस्थितीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र तत्काळ प्रभावाने आता ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालकांच्या माध्यमातून राबविण्यात येईल.