नासुप्र बरखास्तीच्या धास्तीने विकास कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:08 PM2018-03-19T21:08:02+5:302018-03-19T21:08:31+5:30
शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी नाराजी आमदारांनी सोमवारी महापालिका व नासुप्रच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी नाराजी आमदारांनी सोमवारी महापालिका व नासुप्रच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केली.
महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पट्टेवाटपासाठी सर्वेक्षणाचे काम खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र यात दिरंगाई होत असल्याचे कृष्णा खोपडे यांनी निदर्शनास आणले. मिलिंद माने यांनीही नासुप्रच्या विकास कामांना ब्रेक लागल्याचे सांगितले. ज्या झोपडपट्ट्यांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, अशा भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात यावे, अशी सूचना सुधाकर देशमुख यांनी दिली. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी पट्टेवाटपातील अडचणू दूर करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाचे काम रखडले आहे. नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सामाजिक-आर्थिक आणि प्लेन टेबल सर्वेक्षण करून पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश कुकरेजा यांनी दिले. नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील कामे व आरएलचे वाटप होणार नाही तोपर्यंत नासुप्र बरखास्त होणार नाही. त्यामुळे सर्वेक्षणासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली.
२ आॅक्टोबरला पाच हजार घरांचे वाटप
नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप, गुंठेवारीअंतर्गत अभिन्यासाची व भूखंडांची प्रलंबित प्रकरणे याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्वेक्षण पूर्ण होताच दोन दिवसात पट्टेवाटप केले जाईल. आरएल वाटपाचे काम थांबलेले नाही. वर्षभरात २६ आरएल पत्राचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच हजार घरांचे बांधकाम प्रगतीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. २ आॅक्टोबरला या घरांचे वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.