उंच महामार्गामुळे शेती आली पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:51+5:302021-09-25T04:08:51+5:30
भिवापूर : नवनिर्मित उमरेड-भिसी-चिमूर दुपदरी राष्ट्रीय मार्गाच्या उंचीमुळे मालेवाडा येथील शेतकऱ्यांना शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. उंच मार्गामुळे ...
भिवापूर : नवनिर्मित उमरेड-भिसी-चिमूर दुपदरी राष्ट्रीय मार्गाच्या उंचीमुळे मालेवाडा येथील शेतकऱ्यांना शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. उंच मार्गामुळे पावसाचे पाणी शेतात साचत आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसाने तर महामार्गालगतची शेते तलावसदृश झाली. याबाबत येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन देत पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नवनिर्मित उमरेड-चिमूर राष्ट्रीय मार्ग मांगरूळ, गरडापार, चिचाळा, पाहमी, मालेवाडा, जवळी परिसरातून गेला आहे. शेतापासून हा दुपदरी मार्ग कुठे चार तर कुठे पाच फूट उंच आहे. महामार्गाचे काम सुरू असतानाच परिसरातील शेतकऱ्यांनी भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येकडे कंत्राटदाराचे लक्ष वेधले होते. उंच मार्गामुळे पावसाचे पाणी शेतात साचण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. आता मात्र महामार्गाचे काम पूर्ण होताच, शेतकऱ्यांना जमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. एकीकडे महामार्ग उंच, तर दुसरीकडे पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून पिके पाण्याखाली येत आहे. खरिपाच्या हंगामात दोन वेळा येथील शेते पाण्याखाली आली. त्यानंतर आता २१ सप्टेंबरच्या पावसाने तर दोन दिवस शेतात पाणी साचले होते. मालेवाडा येथील शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशात दोन-तीन एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला उंच महामार्गामुळे वर्षभरात दोन-तीन वेळा नुकसान होत असेल तर त्यांनी जगायचे कसे? शेती करायची कशी? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन दिले. प्रशासनाने तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची गावस्थळावर बैठक बोलावून परिस्थितीची पाहणी करावी. शिवाय तत्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नारायण इंगोले, प्रशांत इंगोले, मनोहर वानखेडे, प्रशांत बारेकर, रामू लाखे, आनंद सातपुते, गुंडेराव ढोरे, विनोद लाखे, कवडू सातपुते, धनराज सातपुते, माणिक सातपुते, अरुण चौधरी, सूर्यभान ढोरे, संजय कडू, हरीष ढोरे, हिरालाल आंभोरे, आदी शेतकरी उपस्थित होते.
240921\1923-img-20210924-wa0080.jpg
तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देतांना मालेवाडा येथील शेतकरी