गैरसोयीमुळे अनेक हज यात्रेकरूंची प्रकृती बिघडली
By Admin | Published: September 25, 2014 01:34 AM2014-09-25T01:34:09+5:302014-09-25T01:34:09+5:30
तासन्तास ताटकळत ठेवल्यानंतर एका नादुरुस्त विमानात बसवून विमानतळ प्रशासनाने हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची कुचंबणा केली. असुविधांमुळे अनेक प्रवाशांची प्रकृती खालावल्याने त्यांचा
नागपूर : तासन्तास ताटकळत ठेवल्यानंतर एका नादुरुस्त विमानात बसवून विमानतळ प्रशासनाने हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची कुचंबणा केली. असुविधांमुळे अनेक प्रवाशांची प्रकृती खालावल्याने त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष उफाळून आला. यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हज हाऊस परिसरात मंगळवारी सायंकाळी गोंधळ निर्माण झाला. संतप्त प्रवासी आणि नातेवाईकांनी जोरदार निदर्शने आणि खुर्च्यांची फेकफाक केल्यामुळे राज्य हज कमिटीच्या कार्यालयाच्या खिडक्या फुटल्या.
हज यात्रेला जाण्यासाठी मोठ्या संख्येत मुस्लिम यात्रेकरू आपल्या नातेवाईकांसह मंगळवारी पहाटे विमानतळावर पोहचले. मात्र, सकाळच्या पहिल्याच विमानाला प्रदीर्घ विलंब झाला. तासन्तास ताटकळत बसलेल्या यात्रेकरूच्या आरामाची कसलीही व्यवस्था विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यात प्रवाशांना विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून विलंबाबाबत समाधानकारक माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष उफाळून आला. ते लक्षात आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने यात्रेकरूंना एका विमानात बसवले. ते विमान नादुरुस्त होते. एसी बंद असल्याने यात्रेकरूंना श्वास घेणे अडचणीचे ठरले. गुदमरल्यासारखे झाल्याने अनेकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे काहींना खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. हे वृत्त कळताच यात्रेकरूंचे नातेवाईक आणि अन्य काही मुस्लिम बांधव सायंकाळी ५ च्या सुमारास विमानतळावर पोहचले. त्यांनी तेथील अधिकारी तसेच सेंट्रल तंजिम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना या गैरसोयीमुळे धारेवर धरले. धक्काबुक्की झाली अन् जोरदार नारेबाजीही सुरू झाली. या गोंधळाची माहिती मुंबई, दिल्लीपर्यंत पोहचल्याने विमानतळ प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून जाब विचारण्यात आला. या पार्श्वभूमीवर, अखेर विमानतळ प्रशासनाने हज यात्रेकरूंची सोय केली. विलंबाने का होईना मंगळवारी उशिरा रात्री आणि आज सकाळी हज यात्रेकरू यात्रेसाठी रवाना झाले. (प्रतिनिधी)
पोलिसांनी घेतली नोंद
हज यात्रेकरूंची झालेली गैरसोय लक्षात घेता दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव मंगळवारी रात्री सोनेगाव ठाण्यात धडकले. गणेशपेठ ठाण्यातही मुस्लिम बांधवांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अधिकृत तक्रार मिळाली नसल्यामुळे दोन्ही ठिकाणी स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात आली. मात्र, गुन्हे दाखल झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.