लॉकडाऊन वाढल्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट : प्रवासी घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:35 PM2021-05-15T22:35:02+5:302021-05-15T22:36:21+5:30
Passengers decreased at the bus stand कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभागात केवळ १६ फेऱ्यांची वाहतूक होत असल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याची अट घालून दिली. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभागात केवळ १६ फेऱ्यांची वाहतूक होत असल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने २२ मार्च २०२० पासून १५ सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० तसेच जानेवारी आणि १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले होते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्यात येत होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून १ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १५ मे पर्यंत आणि त्यानंतर ३१ मे पर्यंत वाढविण्यात आले. कोरोनाच्या पूर्वी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ७२० फेऱ्यांची वाहतूक होत होती. ४१० बसेस १ लाख ६० हजार किलोमीटरचा प्रवास करीत होत्या. एकूण २० हजार प्रवाशांच्या वाहतुकीद्वारे नागपूर विभागाला दररोज ४८ लाखांचे उत्पन्न मिळत होते; परंतु सध्या विभागात केवळ १६ फेऱ्या चालविण्यात येत आहेत. केवळ २५०० किलोमीटर बसेस धावत असून, विभागाला दररोज फक्त ६० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. यात प्रवाशांची संख्या ५०० वर आली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला लॉकडाऊनमुळे चांगलाच फटका बसला आहे.